Rahul Dravid will not be head coach in odi : बीसीसीआयने रविवारपासून (१७ डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल केले आहेत. राहुल द्रविड वनडे मालिकेत टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार नाही. या मालिकेसाठी टीम इंडियाला नवा कोचिंग स्टाफ मिळणार आहे. भारतीय मंडळाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ एकदिवसीय विश्वचषक २०२३ पर्यंतचा होता, परंतु बीसीसीआयने तो वाढवला होता. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने अलीकडेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० मालिकेत भाग घेतला. एकदिवसीय मालिकेत तो प्रशिक्षक नसला, तरी या दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत तो प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करेल.
कोण आहे नवीन कोचिंग स्टाफ?
क्रिकबझ या वेबसाइटच्या माहितीनुसार, राहुल द्रविडला कसोटी मालिकेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचे आहे, त्यामुळे त्याने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयनेही द्रविडची विनंती मान्य केली आहे. मात्र, दरवेळीप्रमाणे यंदाही द्रविडच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार नाही. सीतांशु कोटक हे वनडे मालिकेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक अजय रात्रा नव्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झाला आहे, जो क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहे, तर राजीव दत्त गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावतील.
१७ डिसेंबरपासून वनडे मालिकेला होणार सुरुवात –
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना १७ डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता खेळवला जाईल. एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुलक करेल. एकदिवसीय मालिकेनंतर, भारतीय संघ यजमानांशी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भिडणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून न्यू लँड्समध्ये तर दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये होणार आहे.
हेही वाचा – रोहित शर्मा पायउतार होताच MI चे फॉलोअर्स घटले, आता सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत ‘हा’ संघ पहिल्या क्रमांकावर!
रोहित शर्मा कसोटी मालिकेतून करणार पुनरागमन –
भारतीय क्रिकेट संघाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका जिंकायची आहे. भारतीय संघाने अद्याप दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळली जाणारी ही मालिका जिंकून टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचायचा आहे. भारतीय संघ २०२१-२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याच्या जवळ पोहोचला होता. पहिल्या कसोटीत यजमानांचा पराभव करून त्यांनी मालिकेत चांगली सुरुवात केली होती, मात्र शेवटच्या दोन कसोटीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. रोहित शर्माला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये विश्रांती देण्यात आली आहे.