राहूल आवारेनं आता ऑलिंपिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून द्यावं अशी अपेक्षा राहूलचे गुरू काका पवार यांनी व्यक्त केली आहे. गेली आठ ते नऊ वर्षे राहूल पुण्याला काका पवारांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला. राहूलनं ज्यावेळी कॅनडाच्या स्टीफन ताकाशाहीवर मात करत सुवर्ण जिंकलं त्यावेळी पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील तालमीत आनंदाचा एकच जल्लोष उसळला. भारतानं ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये 27 पदकांची लयलूट केली असून राहूल आवारेनं भारताला कुस्तीमधलं पहिलं सुवर्ण मिळवून दिलं आहे.

यावेळी आनंदाश्रू न आवरलेल्या काका पवारांनी राहूलच्या कष्टांचं चीज झाल्याची भावना व्यक्त केली. मूळचा बीडचा असलेल्या राहूलनं सलग सहा वर्ष राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद राहूलनं पटकावलं आहे. आता राहूलपुढे लक्ष्य 2020 चं ऑलिंपिक असून तिथं तो भारताला नक्कीच सुवर्णपदक जिंकून देईल अशी आशा काका पवारांनी व्यक्त केली आहे. राहूल आवारे 57 किलो वजनी गटात असून याआधी त्यानं तीन वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.

 

Story img Loader