दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी गाजवला, तर दुसरा दिवस गाजवला तो पावसाच्या फलंदाजीने. दुसऱ्या दिवशी पावसाने धुवाधार फलंदाजी केल्यामुळे एकही चेंडू खेळणे शक्य झाले नाही. दोन्ही पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी चार वाजता सामना न खेळवण्याचा निर्णय औपचारीकरीत्या जाहीर केला.
तब्बल २९ वर्षांनी ऑस्ट्रेलियामध्ये संपूर्ण दिवस पावसामुळे वाया जाण्याची वेळ शनिवारी आली. यापूर्वी २९ नोव्हेंबर १९८३ साली ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना गाब्बाच्या मैदानावर झाला होता, त्या वेळी या सामन्याचा संपूर्ण अंतिम दिवस पावसामुळे वाया गेला होता.
पहिल्या दिवशी अमला (खेळत आहे ९०) आणि कॅलिस (खेळत आहे ८४) यांनी शतकाच्या दिशेने कूच करत दक्षिण आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. आता रविवारी जेव्हा ते मैदानात उतरतील तेव्हा त्यांच्याकडून शतकाची अपेक्षा असेल.
दुखापतग्रस्त डय़ुमिनी दौऱ्याला मुकणार
पहिला दिवस संपल्यानंतर सरावादरम्यान रग्बी खेळताना दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जे. पी. डय़ुमिनी याच्या डाव्या पायाच्या पोटऱ्यांना दुखापत झाली असून त्याच्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर डय़ुमिनीला तीन ते सहा महिन्यांची विश्रांती घ्यावी लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे त्याला संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावे लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा