सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?.. अशी साद पहिल्या दोन कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा संघ कठीण परिस्थितीत असताना मायकेल क्लार्कने वरुणराजाला घातली होती, पण ती त्याने ऐकली नाही. त्यानंतर मिकी आर्थर गुरुजींनी शिस्त मोडणाऱ्या चार विद्यार्थ्यांना शिक्षा केली. या घटनेचे पडसाद उमटून उपकप्तान शेन वॉटसनने तर थेट सिडनी गाठले. या वादळातून ऑस्ट्रेलियाचा संघ अद्यापही सावरलेला नाही. मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर पडलेल्या ऑसी संघाला प्रतिष्ठा टिकविण्यासाठी उर्वरित दोन्ही लढती जिंकणे क्रमप्राप्त आहे. पण तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मोहालीत ‘नभ उतरू आलं’ त्यामुळे दोन्ही संघांना ‘चिंब थरथरवलं..!’ सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अखेर एकही चेंडू न टाकता दिवसभराचा खेळ रद्द करण्यात आला.
सलग तिसऱ्या कसोटी विजयाचे स्वप्न जोपासणाऱ्या भारतीय संघाची मोहालीच्या पहिल्या दिवशी निराशा झाली. चंदिगढ शहराला मुसळधार पावसाने झोडपल्यामुळे स्थानिक वेळेनुसार, दुपारी १ वा. १५ मिनिटांनी अधिकृतपणे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. पंजाब क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव जी. एस. वालिया यांनी जेव्हा याबाबतची अधिकृत घोषणा केली, तेव्हा खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली होती, तर नाणेफेकीचा कौलसुद्धा उडविण्यात आलेला नव्हता.
भारतीय संघाला कोणत्याही संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोनपेक्षा अधिक कसोटी सामने क्वचितच जिंकता आले आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत चेन्नई आणि हैदराबादचे सामने जिंकून भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील कांगारूंची स्थिती पाहता भारतीय संघ सहजगत्या ‘व्हाइटवॉश’ देण्याची शक्यता आहे. महेंद्रसिंग धोनी आणि त्याची भारतीय सेना हा इतिहास घडवू इच्छिते आहे, परंतु वरुणराजाने पहिल्या दिवशी व्यत्यय आणला आहे. शुक्रवारीसुद्धा पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याआधी, सकाळच्या सत्रात पावसाचे थमान पाहून भारतीय संघ निवासस्थानाची व्यवस्था असलेल्या हॉटेलमध्ये परतला. तथापि, ऑस्ट्रेलियाच्या संघाने रिमझिम पावसाच्या सान्निध्यात सकाळचा चहा घेतला. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या संघव्यवस्थापनाच्या चर्चा मात्र सुरूच होत्या.
‘‘पहाटे ३ वाजल्यापासून पावसाचा वर्षांव सुरू आहे. मैदान खेळण्यासाठी अनुकूल करण्यासाठी किमान दोन तास लागतील, परंतु दुपारीसुद्धा पावसाचा इशारा देण्यात आला आहे,’’ अशी माहिती आयसीसीचे पंच रिचर्ड केटलबोरोघ यांनी खेळपट्टीची पहिल्यांदा पाहणी केल्यानंतर दिली. गुरुवारी हवामान खात्याने कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस पडणार असल्याचे वर्तवले होते.
त्यामुळे दिल्लीचा डावखुरा फलंदाज शिखर धवनचे कसोटी पदार्पण लांबले आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे २०१०मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघच समोर असताना धवनचे एकदिवसीय पदार्पणसुद्धा लांबले होते. दोन कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या वीरेंद्र सेहवागच्या स्थानावर धवनला संधी मिळणार आहे.
आर्थर यांनी चार खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ १३ जणांचा झाला आहे. दुखापतग्रस्त मॅथ्यू वेडच्या जागी अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज ब्रॅड हॅडिनला संघात पाचारण केले आहे. जेम्स पॅटिन्सन संघाबाहेर असल्यामुळे स्वाभाविकपणे मिचेल स्टार्क आणि पीटर सिडल वेगवान माऱ्याची धुरा वाहतील. अष्टपैलू लेग-स्पिनर स्टीव्हन स्मिथसोबत झेव्हियर डोहर्टी आणि नॅथन लिऑन फिरकीची धुरा वाहतील. त्यामुळे हैदराबाद कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला अंतिम संघात स्थान मिळवणे कठीण जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा