आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी केल्याप्रकरणी सहमालक राज कुंद्रा अडचणीत सापडला असताना राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास कुंद्रावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे राजस्थान रॉयल्सने स्पष्ट केले आहे.
सट्टेबाजी प्रकरणात कुंद्राचा सहभाग असल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना राजस्थान रॉयल्सने म्हटले आहे की, ‘‘आम्ही खेळाडू, व्यवस्थापन अथवा मालक या सर्वासाठी सारखेच नियम अंमलात आणतो, अशी फ्रेंचायझी म्हणून आम्ही नेहमीच ठाम भूमिका घेतो. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणातील आरोपांच्या पाश्र्वभूमीवर खेळाडूंप्रमाणेच सर्वाच्या बाबतीत आमची कारवाई सारखीच आहे,’’ असे राजस्थान रॉयल्सचे कार्याध्यक्ष रणजित बर्थाकूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघू अय्यर यांनी निवेदनात म्हटले आहे.
‘‘राज कुंद्रा यांच्याकडे फक्त ११.७ टक्के हिस्सेदारी आहे. फ्रेंचायझी चालवण्यात त्यांचा सहभाग नाही. कुंद्रा हे कायद्याचा सन्मान करणारे व्यक्ती असल्यामुळे ते त्याचा भंग करणार नाही. परंतु जर ते दोषी आढळल्यास अथवा त्यांनी कोणत्याची नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. याचप्रमाणे त्यांना हिस्सेदारी गमवावी लागेल. राजस्थान रॉयल्सच्या समभागधारकांसाठी ही कठोर नियमावली आहे,’’ असे पुढे म्हटले आहे.

हकालपट्टी टाळण्यासाठी राजस्थान रॉयल्सची रणनीती
नवी दिल्ली : सट्टेबाजी प्रकरणात राज कुंद्रा अडकत असल्याची चिन्हे दिसताच राजस्थान रॉयल्सने त्याच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. कारण राजस्थान रॉयल्स संघावर हद्दपारीची टांगती तलवार आहे. बीसीसीआयच्या आयपीएलसंदर्भातील नियम क्रमांक ११.३ (क) अनुसार, कोणत्याही मालकाने खेळाची प्रतिष्ठा गमावणारे कृत्य केल्यास त्या संघाची हकालपट्टी करण्यात येईल. कुंद्रा प्रकरणी आवश्यकता भासल्यास कारवाई करण्याच्या हेतूने बीसीसीआयने सोमवारी कार्यकारिणी समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स प्रशासन सावध झाले आहे.

माजिद मेमन कुंद्राची वकिली करणार
नवी दिल्ली : आयपीएल सामन्यांमध्ये सट्टा लावल्याचे आरोप होत असल्याने राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांनी आपला खटला चालवण्यासाठी ख्यातनाम वकील माजिद मेमन यांना नियुक्त केले आहे.

दाऊद, शकीलविरुद्ध पोलिसांना अजामीन वॉरंट हवे!
नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहीम व छोटा शकील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात यावे, अशी मागणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केली आहे. या दोन्ही गुन्हेगारांच्या आदेशानुसारच हे फिक्सिंग झाले, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनयकुमार खन्ना यांच्या न्यायालयात दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने दाऊद व शकीलविरुद्ध पकड वॉरंट काढावे, अशी मागणी केली. या अर्जात म्हटले आहे की, दाऊद व शकील हे वेळोवेळी भारतामधील सट्टेबाज आणि स्पॉट-फिक्सिंग करणाऱ्यांना निर्देश देतात. या दोघांचा मुंबई येथे ठावठिकाणा उपलब्ध न झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीन वॉरंट काढावे लागणार आहे. या अर्जावर १० जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

सट्टेबाज रमेश व्यास मुंबईहून दिल्लीला रवाना
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड संबंध असलेला सट्टेबाज रमेश व्यासला मुंबईहून दिल्लीला हलवण्यात येणार आहे. मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने सट्टेबाजीप्रकरणी व्यासला अटक केली होती. व्यास याला रेल्वेने नेण्यात येणार असून, सहा सुरक्षारक्षक त्याच्याबरोबर असणार आहेत. शनिवारी व्यास दिल्लीत पोहोचणार आहे. ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या व्यासला दिल्ली पोलिसांना चौकशीसाठी ताब्यात घ्यायचे होते. मात्र तुरुंग अधिकाऱ्यांनी असे करण्यास नकार दिल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

मी दोषी आढळल्यास रॉयल्स संघातील समभागाचा हिस्सा सोडून देईन. राजस्थान रॉयल्स संघाच्या मालकीमध्ये माझा छोटासा वाटा आहे, त्यामुळे दिल्ली पोलिसांनी मला बोलावले होते. त्यांनी मला काही प्रश्न विचारले आणि मी त्यांची समाधानकारक उत्तरे दिली. मी कोणताही गैरप्रकार केलेला नाही, मी निर्दोष आहे. राजस्थान रॉयल्समध्ये नक्की काय चुकीचे घडले आहे, हे जाणून घेण्यास मीही सामान्य लोकांएवढाच उत्सुक आहे.
-राज कुंद्रा, राजस्थान रॉयल्सचे सहमालक