घरचे मैदान असूनही विदर्भने राजस्थानच्या २१६ धावांना उत्तर देताना संथ आणि कूर्म गतीने खेळ करीत दिवसभरात जेमतेम २०२ धावांची मजल मारली. काही दिवसांपूर्वीच रणजी क्रिकेट स्पर्धेत १०,००० धावा करण्याचा विक्रम नावावर करणारा अनुभवी वसिम जाफर ८ धावा करून तंबूत परतला. भरवशाच्या फैझ फझलने ४० धावांची खेळी केली, मात्र त्यासाठी ८८ चेंडू खर्ची घातले. सुब्रमण्यम बद्रिनाथ याही लढतीत मोठी खेळी करू शकला नाही. त्याने २९ धावा केल्या. गणेश सतीशने १२ धावा केल्या. आदित्य शनवारे केवळ ९ धावा करून तंबूत परतला. जितेश शर्माही मोठी खेळी करू शकला नाही. त्याने १४ धावा केल्या. रवी जंगिड आणि आदित्य सरवटे यांनी सातव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करीत विदर्भला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जंगिड २७, तर सरवटे ४२ धावांवर खेळत आहेत. विदर्भचा संघ अजूनही १४ धावांनी पिछाडीवर आहे. राजस्थानतर्फे अनिकेत चौधरी, तन्वीर उल हक यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
राजस्थान : २१६ विरुद्ध विदर्भ ६ बाद २०२ (आदित्य सरवटे ४२, फैझ फझल ४०, अनिकेत चौधरी २/४०).
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2015 रोजी प्रकाशित
विदर्भची कूर्म वाटचाल
आदित्य सरवटे यांनी सातव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करीत विदर्भला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
Written by वृत्तसंस्थाझियाउद्दीन सय्यद
First published on: 17-11-2015 at 00:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan fight back against vidarbha