अंतर्गत बंडाळ्या आणि हेवेदाव्यांचे राजकारण यात अडकलेल्या राजस्थान क्रिकेटसमोर मंगळवारी आणखी एक नामुश्की ओढवली. विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेच्या मध्य विभागाच्या नागपूर येथे झालेल्या लढतीत रेल्वेने राजस्थानचा डाव अवघ्या ३५ धावांत गुंडाळला. भारतीय स्थानिक क्रिकेटमधील ही दुसरी नीचांकी धावसंख्या आहे. २००० साली मुंबईने सौराष्ट्रचा ३४ धावांत खुर्दा उडवला होता.
जुन्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर राजस्थानचा कर्णधार पंकज सिंगने नाणेफेकजिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र अनुरीत सिंग आणि अमित मिश्रा यांच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. अर्जित गुप्ता (१३) अपवाद वगळता एकाही फलंदाजला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. राजस्थानच्या पहिल्या चार फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. राजस्थानच्या फलंदाजांनी प्रतिकार करण्याची तयारी न दर्शवल्याने १५.३ षटकांतच राजस्थानचा डाव ३५ धावांतच गडगडला. अनुरीत सिंगने १६ धावांत ५, तर अमित मिश्राने १८ धावांत ५ बळी घेतले.
रेल्वेच्या फलंदाजांनी हे नाममात्र लक्ष्य केवळ एका विकेट्सच्या मोबदल्यात गाठले आणि दणदणीत विजयाची नोंद केली. राजस्थानच्या फलंदाजांच्या शरणागतीमुळे हा सामना २१ षटकांतच आटोपला.
‘खेळपट्टी फलंदाजीसाठी धोकादायक नव्हती. रविवारी आम्ही याच खेळपट्टीवर २४० धावांपर्यंत मजल मारली होती. अनुरीत-अमित जोडीने नवा चेंडू हाताळताना अचूक मारा केला. त्यांच्या दिमाखदार कामगिरीमुळेच आम्ही हा विजय साकारू शकलो,’ असे रेल्वेचा कर्णधार महेश रावतने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा