Sairaj Bahutule New Spin Bowling Coach of Rajasthan Royals for IPL 2025 : राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत फक्त एकदाच आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. तेही २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात. त्यानंतर या संघाला जेतेपद जिंकता आलेले नाही. आता आयपीएल २०२५ च्या आधी, राजस्थान रॉयल्स संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे. माजी भारतीय लेग स्पिनर साईराज बहुतुले यांची फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याच्याकडे अनुभव आहे, जो राजस्थान संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. यंदाच्या हंगामात राजस्थानसाठी साईराज बहुतुले कर्णधार संजू सॅमसनसोबत काम करतील.
बहुतुले यापूर्वीही राजस्थान रॉयल्सचा भाग राहिलेत –
राजस्थान रॉयल्सच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, ५२ वर्षीय साईराज बहुतुले रॉयल्समध्ये परतले आहेत. ते २०१८-२१ पर्यंत आमच्या संघाचा भाग राहिले आहेत. त्यांची कोचिंग कारकीर्द यशस्वी राहिली आहे. ज्यामध्ये मुंबई, बंगाल, केरळ सारख्या संघांचे आणि भारतीय राष्ट्रीय पुरुष संघाचा कोच राहिले आहेत. त्यांनी यापूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबतही काम केले आहे.
राहुल द्रविडकडून बहुतुले यांचे कौतुक –
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, “बहुतुले यांची फिरकी गोलंदाजीची सखोल समज आणि त्यांचा व्यापक प्रशिक्षण अनुभव त्यांना आमच्या संघासाठी महत्त्वाचा ठरु शकतो. तरुण गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याची त्यांची क्षमता राजस्थान रॉयल्समधील आमच्या विचारांशी अगदी जुळते. त्याच्यासोबत पूर्वी काम केल्यामुळे, मला खात्री आहे की त्याच्या ज्ञानाचा आमच्या खेळाडूंना फायदा होईल.”
प्रथम श्रेणी कारकीर्द चमकदार राहिलीय –
राजस्थान रॉयल्सच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर, साईराज बहुतुले म्हणाले की, “राहुल द्रविड आणि इतर प्रशिक्षकांसोबत काम करून आमचा गोलंदाजी आक्रमण विकसित करण्यास आणि संघाच्या यशात योगदान देण्यास मी उत्सुक आहे.” बहुतुले यांनी भारतासाठी दोन कसोटी आणि आठ एकदिवसीय सामने खेळले आहेत. जरी त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नसली, तरी त्यांची प्रथम श्रेणी कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी सहा हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ६३० विकेट्स घेतल्या आहे. याशिवाय, त्यांनी लिस्ट ए सामन्यांमध्ये १९७ विकेट्स घेतल्या.