सलामीवीर अजिंक्य रहाणेची शानदार फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाज रजत भाटियाच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या सातव्या मोसमात दुबळ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दुसऱ्यांदा विजय मिळवण्याची किमया साधली. राजस्थानच्या द्विशतकी आव्हानापुढे दिल्लीच्या संघाने अक्षरश: शरणागती पत्करली. त्यामुळे राजस्थानने सातव्या विजयासह १४ गुणांसह गुणतालिकेत आपले तिसरे स्थान टिकवून ठेवले आहे.
अजिंक्य रहाणेचे अर्धशतक आणि संजू सॅमसनच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या बळावर राजस्थाने ६ बाद २०१ अशी यंदाच्या आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यापुढे दिल्लीला जेमतेम ९ बाद १३९ धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून मनोज तिवारीने नाबाद ६१ धावा काढत झुंज दिली.
दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने नाणेफेक जिंकल्यावर राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रहाणेने ५० चेंडूंत ६४ धावा काढताना आठ चौकार आणि एका षटकाराची अदाकारी पेश केली, तर सॅमसनने २५ चेंडूंत ४० धावा काढल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६.३ षटकांत ७४ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये केव्हॉन कुपरने १६ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारासह ३२ धावा केल्या. तसेच जेम्स फॉल्कनरने ८ चेंडूंत तीन षटकारांसह नाबाद २३ धावा केल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा