स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे दोन वर्षांच्या बंदीचा काळ सरल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आयपीएलच्या ११ व्या हंगामात पुनरागमनासाठी सज्ज झालेले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आपल्या नावावर लागलेला डाग पुसून टाकण्यासाठी राजस्थानच्या संघाने कंबर कसलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या नावातील राजस्थान हा शब्द वगळला असून यापुढे हा संघ केवळ रॉयल्स या नावाने ओळखला जाणार आहे. याचसोबत राजस्थानच्या संघव्यवस्थापनाने आपला तळ राजस्थानवरुन पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतलाय. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने या बदलांना मान्यता दिल्याचंही समजतंय.
याशिवाय चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे मालक आणि इंडियन सिमेंट कंपनीचे सर्वेसर्वा एन.श्रीनीवासन यांनी आपल्या मालकीचे समभाग कंपनीतल्या इतर भागधारकांच्या नावावर केले आहेत. २०१५ साली गाजलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सचे राज कुंद्रा आणि एन. श्रीनीवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन हे दोषी आढळले होते. यानंतर बीसीसीआयने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती मुकुल मुदगल समितीने दोन्ही संघांवर दोन वर्षांची बंदी घातली होती. दरम्यानच्या काळात बीसीसीआयमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय बदल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टीस लोढा समितीने गुरुनाथ मय्यप्पन आणि राज कुंद्रा यांना भारतीय क्रिकेटमधून बेदखल करण्याची शिक्षा सुनावली होती.
पुणे सुपरजाएंट संघाचे मालक संजीव गोएंका यांच्याशी झालेल्या करारानुसार राजस्थान संघ व्यवस्थापनाने आपल्या नावातील राजस्थान हा शब्द वगळून केवळ रॉयल्स हा शब्द ठेवल्याचं समजतंय. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत पुण्याच्या संघात चेन्नईच्या अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली होती. त्यामुळे नवीन हंगामासाठी केलेला हा बदल चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघांसाठी किती फायदेशीर ठरतो हे पहावं लागणार आहे.
अवश्य वाचा – पुण्याच्या मैदानात धोनीचा आणखी एक विक्रम