संजू सॅमसनची झुंजार फलंदाजी आणि त्याला मिळालेली अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसनची साथ यामुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या सहाव्या मोसमातील विजेत्या मुंबई इंडियन्सवर सलामीच्या लढतीत सात विकेट्सनी मात केली आणि चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पध्रेत विजयी सलामी नोंदवली.
मुंबईचे १४३ धावांचे आव्हान पार करताना दुसऱ्याच षटकांत राजस्थानचा कर्णधार राहुल द्रविड (१) बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर रहाणे आणि सॅमसन यांनी किल्ला लढवत दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भर घातली. रहाणेने ३३ तर सॅमसनने ५४ धावांची खेळी केली. २४ चेंडूंत ३३ धावांची आवश्यकता असताना वॉटसन आणि स्टुअर्ट बिन्नी (प्रत्येकी नाबाद २७) यांनी शानदार खेळी करत राजस्थानला विजय मिळवून दिला.
रोहित शर्मा (४४) आणि किरॉन पोलार्ड (४२) यांच्या उपयुक्त योगदानामुळे मुंबईने ७ बाद १४२ धावा उभारल्या होत्या. कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा खेळणारा सचिन तेंडुलकर १५ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर रोहितने पोलार्डसह पाचव्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी रचून मुंबईच्या डावाला आकार दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan royals cruise to win in champions league twenty20 opener