यंदाच्या आयपीएलच्या मोसमात सलामीच्याच लढतीत पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. भरवशाचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला आहे. सोमवारी पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये बेन स्टोक्सला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असून त्या पार्श्वभूमीवर बेन स्टोक्सला आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांमध्ये खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, बेन स्टोक्स संघासोबतच राहून इतर सहकाऱ्यांना पाठिंबा देणार असल्याचं राजस्थान रॉयल्सकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या ट्वीटर हँडलवर त्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

 

पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना बेन स्टोक्सच्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती. क्रिकेट इंग्लंडकडून यासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला असून माहिती देण्यात आली आहे. क्रिकेट इंग्लंडचा सपोर्ट स्टाफ स्टोक्सच्या संपर्कात असून त्याच्या बोटाचा दुसरा एक्स-रे काढण्यात येणार आहे. त्यावरून त्याची दुखापत किती गंभीर आहे, याचा अंदाज येईल, असं क्रिकेट इंग्लंडकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ख्रिस गेलचा कॅच पकडताना बेन स्टोक्सला दुखापत झाली होती.

 

MI vs KKR : मुंबई इंडियन्सने चेन्नईत उभारली विजयाची गुढी

सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं राजस्थान रॉयल्ससमोर २२१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. उत्तरादाखल राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत विक्रमी शतक ठोकलं. मात्र, ते राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसं ठरलं नाही आणि राजस्थानला अवघ्या ४ धावांना पंजाब किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यामध्ये बेन स्टोक्स राजस्थानकडून सलामीला उतरला होता. मात्र, त्याला मोहम्मद शमीनं तिसऱ्याच चेंडूवर क्लीन बोल्ड केलं होतं. तर गोलंदाजीमध्ये बेन स्टोक्स फक्त एकच षटक टाकू शकला होता. त्यामध्ये पंजाबच्या फलंदाजांनी १२ धावा कुटल्या होत्या.

Story img Loader