‘स्पॉट-फिक्सिंग’च्या वादळामुळे हादरलेल्या राजस्थान रॉयल्सला बुधवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध मिळविलेल्या आश्चर्यकारक विजयामुळे दिलासा मिळाला. आता दुसऱ्या पात्रता सामन्यात त्यांच्यासमोर आव्हान आहे ते रथी-महारथी खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबई इंडियन्सचे. चेन्नई सुपर किंग्जने तिसऱ्या जेतेपदाच्या ईष्रेने आधीच रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे. आता राजस्थान आणि मुंबई यांच्यातील ‘शूटआऊट अ‍ॅट ईडन गार्डन्स’ लढतीने आयपीएलच्या सहाव्या पर्वातील अंतिम फेरीचा दुसरा संघ ठरणार आहे.
कागदावर मुंबई इंडियन्सचा संघ नक्की सरस वाटतो. पण हैदराबादविरुद्ध चार विकेट राखून मिळविलेल्या विजयामुळे राजस्थानचा आत्मविश्वास दुणावला आहे. ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाने दहशत, दडपण यांना झुगारत इथवर मजल मारली आहे. आता जेतेपदापासून राजस्थान आणि मुंबई हे दोन्ही संघ फक्त दोन पावलांच्या अंतरावर आहेत.
बुधवारी ‘एलिमिनेटर’ सामन्यात राजस्थानला विजयासाठी २९ चेंडूंत ५४ धावांची आवश्यकता होती, तेव्हा ते जिंकतील असे कुणालाही वाटले नव्हते. पण ब्रॅड हॉजने चमत्कार घडवला. त्याने विजयाचा घास अक्षरश: सनरायजर्सच्या तोंडातून हिसकावून घेतला. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या ‘क्वालिफायर’ सामन्यात चेन्नईकडून ४८ धावांनी पराभव पत्करून आला आहे. अखेरच्या साखळी सामन्यातसुद्धा मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ५० धावांनी पराभव पत्करला होता.
मुंबई इंडियन्सने २०१०मध्ये आयपीएलचे उपविजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर पुढील वर्षी मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स लीग जिंकण्याची किमया साधली होती. आयपीएलच्या सहाव्या पर्वात मुंबई इंडियन्सला १७ सामन्यांनंतरही अद्याप नियमित सलामीवीर जोडी मिळालेली नाही. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी ढिसाळ गोलंदाजी केली. त्यामुळे चेन्नईने १९३ धावा केल्या. त्यानंतर दडपणाखाली मुंबईची फलंदाजीची फळी कोसळली. त्या सामन्यात मायकेल हसी आणि सुरेश रैनाने तुफानी हल्ला चढवला होता. या दोघांनी १४० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती.
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ड्वेन स्मिथने २८ चेंडूंत ६८ धावा केल्या होत्या. त्याला गवसलेला फॉर्म हा मुंबईसाठी सुखद ठरू शकेल. दिनेश कार्तिक आणि कप्तान रोहित शर्मा दडपणाखालीसुद्धा आत्मविश्वासाने खेळण्यात वाकबदार आहेत. पण मुंबई इंडियन्सची सर्वात महत्त्वाची ताकद आहे ती म्हणजे किरॉन पोलार्ड. कठीण परिस्थितीतून संघाला सहीसलामतपणे बाहेर काढण्यात तो हुशार आहे. याचप्रमाणे ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर आत्मविश्वासाने चेंडू वळवू शकणारे हरभजन सिंग आणि प्रग्यान ओझा त्यांच्याकडे आहेत.
राजस्थान रॉयल्सचा सर्वाधिक भरवसा आहे तो ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन आणि ब्रॅड हॉज या स्फोटक फलंदाजांवर. व्हिक्टोरियाच्या ३८ वर्षीय हॉजने २००३मध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सध्या ट्वेन्टी-२०मधील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या हॉजने १९५ सामन्यांत ५५४८ धावा केल्या आहेत.
ईडन गार्डन्स मैदानावर विजयांच्या बाबतीत मुंबई इंडियन्स राजस्थानपेक्षा पुढे आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानने कोलकाता नाइट रायडर्सकडून आठ विकेट राखून पराभव पत्करला होता. त्या वेळी द्रविडने बचावात्मक नेतृत्व केले होते. पण या वेळी मात्र आक्रमक क्रिकेट आणि नेतृत्व पाहायला मिळेल, अशी क्रिकेटरसिकांची अपेक्षा आहे.

सामना : मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स.
स्थळ : ईडन गार्डन्स, कोलकाता.
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स वाहिनीवर.