चेंडू कुरतडल्याच्या आरोपांवरुन ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या स्टिव्ह स्मिथच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाने स्टिव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपब्लीक टीव्हीने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. राजस्थान संघप्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चेंडु कुरतडण्याच्या प्रकरणात स्मिथवर तात्काळ कारवाई होईल. या प्रकरणी स्मिथने आपली चूक मान्य केल्यामुळे कोणत्याही अहवालाची वाट राजस्थान रॉयल्स पाहणार नसल्याचंही समजतंय. अकराव्या हंगामासाठी अजिंक्य रहाणेकडे राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदाची सुत्र जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात बेनक्रॉफ्ट चेंडुशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. एका पिवळसर वस्तुने बेनक्रॉफ्ट चेंडू घासताना टेलिव्हीजन कॅमेऱ्यामध्ये दिसत होता. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि बेनक्रॉफ्ट यांनी आपली चूक मान्य करत, हा आपल्या रणनितीचा एक भाग असल्याचं मान्य केलं. या प्रकरणानंतर स्मिथ आणि ऑस्ट्रेलियन संघावर टीकेचा भडीमार झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियन पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी, स्मिथच्या वर्तनाने ऑस्ट्रेलियाची नाचक्की झाल्याचं म्हणत स्मिथला कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला.
अवश्य वाचा – ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये वादळ! स्मिथ-वॉर्नरचा राजीनामा; टीम पेन नवा कर्णधार
चहुबाजूंनी वाढत असलेल्या दबावामुळे अखेर स्टिव्ह स्मिथ आणि उप-कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणं पसंत केलं आहे. स्टिव्ह स्मिथच्या अनुपस्थितीत टीम पेनकडे ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्सने स्मिथच्या प्रकरणी आपली अधिकृत भूमिका अद्यापही जाहीर केलेली नाहीये, मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयल्सचं संघप्रशासन स्मिथवर कारवाई करणार असल्याचं बोललं जातंय.
अवश्य वाचा – स्मिथने देशाची नाचक्की केली, कर्णधारपदावरुन तातडीने हटवा; ऑस्ट्रेलिया सरकारचा आदेश