घरच्या मैदानावर विजयी परंपरेचा विक्रम नावावर असणारा राजस्थान रॉयल्सचा संघ ओटॅगोविरुद्ध अडचणीत सापडला होता मात्र चिरतरुण ब्रॅड हॉजने नाबाद अर्धशतकी खेळी साकारत राजस्थानला दिमाखदार विजय मिळवून दिला. या मैदानावरचा राजस्थानचा हा सलग बारावा विजय आहे. ओटॅगोने दिलेल्या १४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली. अजिंक्य रहाणेने ७ चौकारांसह ४८ चेंडूत ५२ धावांची खेळी साकारली.  रहाणे-हॉज जोडीने पाचव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी करत डाव सावरला. रहाणे बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्रे हाती घेत रॉयल्सला दिमाखदार विजय मिळवून दिला. हॉजने केवळ २३ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद ५२ धावा केल्या.
तत्पूर्वी राजस्थानच्या भेदक गोलंदाजीपुढे ओटॅगोची ४ बाद २१ अशी स्थिती झाली होती. मात्र यानंतर रायन डेन डुस्काटा आणि जेम्स नीशाम यांनी पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करत डाव सावरला. नीशामने २५ चेंडूत ३२ तर डुस्काटाने २६ धावा केल्या. नॅथन मॅक्युल्लमने २० चेंडूत नाबाद २८ धावांची खेळी केली. इयान बटलरने १८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २५ धावा केल्या. ओटॅगोने १३९ धावांची मजल मारली. राहुल शुक्लाने २३ धावांत ३ बळी टिपले. केव्हॉन कूपरने २ तर शेन वॉटसन आणि प्रवीण तांबेने प्रत्येकी एक विकेट घेत राहुलला चांगली साथ दिली.

Story img Loader