नावात काय आहे, असं शेक्सपिअर म्हणून गेला. मात्र सध्याच्या काळात क्रिकेटमध्ये नावातच सर्व काही आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली दोन वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या राजस्थान रॉयल्सने आपल्या संघाचं नाव बदलण्याची परवानगी बीसीसीआयकडे मागितली आहे. यापाठीमागचं नेमकं कारण अद्यापही समोर आलं नसलं, तरीही फिक्सिंग प्रकरणात आपल्या संघावर लागलेले सर्व डाग पुसून काढण्याचा राजस्थान रॉयल्सचा या माध्यमातून प्रयत्न असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगते आहे.

इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातलं वृत्त प्रसारित केलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या पदाधिकऱ्यांनी आमच्याकडे नाव बदलण्याची परवानगी मागितली आहे, मात्र यापाठीमागचं कारण त्यांनी अजुनही स्पष्ट केलं नसल्याचं बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या मुकुल मुदगल समितीने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांवर दोन वर्षांची बंदी घातली होती. सट्टा लावल्याप्रकरणी राजस्थानचे मालक राज कुंद्रा आणि चेन्नईचे मालक गुरुनाथ मय्यप्पन यांना आजन्म क्रिकेटमधून बेदखल केलं होतं.

दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगल्यानंतर आता राजस्थान आणि चेन्नईचे संघ आयपीएलच्या ११ व्या मोसमात पुनरागमन करणार आहेत. मात्र त्याआधी आपल्या संघावर झालेले फिक्सींगचे आरोप आणि त्यातून डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी राजस्थान रॉयर्ल संघाने आपलं नाव बदलण्याची परवानगी मागितलेली आहे. यावेळी संघाने जयपूरमधून आपला तळ हलवण्याची परवानगीही बीसीसीआयकडे मागितल्याचं समजतंय.

अकराव्या मोसमात आयपीएलमध्ये केवळ ८ संघ खेळणार आहेत. पुणे आणि गुजरात या संघांशी बीसीसीआयने केवळ २ वर्षांचा करार केला होता, त्यामुळे अकराव्या मोसमापासून राजस्थान आणि चेन्नई हे संघ आयपीएलच्या युद्धात पुनरागमन करतील. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने मागितलेल्या परवानगीला बीसीसीआय कसा प्रतिसाद देतंय हे पहावं लागणार आहे.

Story img Loader