राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ जेव्हा अखेरचे एकमेकांशी भिडले होते, तेव्हा क्रिकेटरसिकांना आयपीएलच्या सातव्या मोसमातील एका थरारक लढतीची अनुभूती मिळाली होती. सुपर ओव्हपर्यंत रंगलेला तो सामना शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सने जिंकला होता. सोमवारी हेच दोन संघ पुन्हा एकदा आमने-सामने असणार आहेत. त्यामुळे आणखी एका रंगतदार लढतीची क्रिकेटरसिकांना अपेक्षा आहे.
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात अबू धाबी येथे २९ एप्रिलला राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना निर्धारित षटकांमध्ये बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही तो बरोबरीत राहिला. अखेरीस सर्वाधिक सीमापार चेंडू धाडणाऱ्या राजस्थानला विजयी घोषित करण्यात आले. हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या त्या सामन्यातील पराभवाचे उट्टे फेडण्यात कोलकाता नाइट रायडर्स यशस्वी होतो का, ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
गुणतालिकेनुसार ताकदीची तुलना केल्यास राजस्थानचा संघ हा कोलकातापेक्षा सरस आहे. शनिवारी रात्री राजस्थानने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दिमाखदार विजय मिळवला. यात युवा खेळाडू करुण नायरच्या ५० चेंडूंतील ७३ धावांचा सिंहाचा वाटा होता; तथापि कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून ३४ धावांनी हार पत्करली होती.
फॉर्मात असलेले फलंदाज हे राजस्थान रॉयल्सचे बलस्थान आहे. सलग तीन सामने जिंकणाऱ्या राजस्थानला त्यामुळेच सोमवारी कोलकाताला हरवणे जड जाणार नाही. शेन वॉटसन आणि संजू सॅमसन संघाच्या यशात योगदान देत आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत राजस्थानची मदार आहे ती लेग-स्पिनर प्रवीण तांबेवर. याचप्रमाणे वेगवान गोलंदाजीची धुरा जेम्स फॉल्कनर सांभाळत आहे. त्याला धवल कुलकर्णी आणि केन रिचर्डसन हे तोलामोलाची साथ देत आहेत.
दुसरीकडे सलग तीन पराभवांना सामोरा गेलेला कोलकाता नाइट रायडर्सचा संघ विजयासाठी झगडत आहे. फलंदाजी ही त्यांची सर्वात चिंतेची बाब आहे. नेतृत्व आणि फलंदाजी या दोन्ही पातळीवर गौतम गंभीर अपयशी ठरला आहे. अनुभवी जॅक कॅलिससुद्धा चांगली कामगिरी करू शकलेला नाही. गोलंदाजीमध्ये कोलकाताचा संघ वेस्ट इंडिजचा सुनील नरिन आणि बांगलादेशच्या शाकिब अल हसन या फिरकी गोलंदाजांवर अवलंबून आहे. त्यांच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व आर. विनय कुमारच्या खांद्यावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan royals vs kolkata knight riders ipl