राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांना प्रमुख विदेशी खेळाडूंची उणीव भासणार

प्रमुख विदेशी खेळाडू आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी माघारी परतल्यामुळे शनिवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघांना नव्याने संघबांधणी करावी लागणार आहे.

हैदराबादच्या तुलनेत राजस्थानला विदेशी खेळाडूंच्या जाण्याने अधिक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स, सलामीवीर जोस बटलर आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हे तिघेही इंग्लंडला माघारी परतले असून, कर्णधार स्टीव्ह स्मिथदेखील काही दिवसांतच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेला संजू सॅमसन, रियान पराग, राहुल त्रिपाठी या नव्या दमाच्या खेळाडूंसह आव्हानांसाठी सज्ज व्हावे लागणार आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध गुरुवारी रोमहर्षक विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावला असेल. या लढतीत सामनावीर ठरलेल्या वरुण आरोनवर गोलंदाजीची धुरा राहील. त्याशिवाय फिरकीपटू श्रेयस गोपाळ चमकदार कामगिरी करत आहे.

दुसरीकडे डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या धडाकेबाज सलामीवीरांच्या बळावर हैदराबादने या हंगामात अनेक सामन्यांत विजय मिळवले. १० सामन्यांतून पाच विजय मिळवणाऱ्या हैदराबादला राजस्थानच्या तुलनेत बाद फेरी गाठण्याची अधिक संधी आहे. परंतु बेअरस्टो इंग्लंडला माघारी परतल्याने वॉर्नरला सलामीचा साथीदार शोधावा लागणार आहे. वॉर्नरदेखील २९ एप्रिल रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियात जाणार आहे. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन या सामन्यासाठी परतला असल्यामुळे त्याच्यासह मार्टनि गप्टिल उर्वरित सामन्यांत सलामीला येऊ शकतो. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, रशीद खान, संदीप शर्मा यांना कामगिरी सुधारण्याची आवश्यकता आहे.

संघ

राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अ‍ॅश्टन टर्नर, ईश सोधी, ओशेन थॉमस, लिआम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेसन मिधून, जयदेव उनाडकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरो, आर्यमन बिर्ला, रियान पराग, मनन वोरा, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण आरोन, शशांक सिंग, राहुल त्रिपाठी.

सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), मनीष पांडे, मार्टिन गप्टिल, रिकी भुई, डेव्हिड वॉर्नर, दीपक हुडा, मोहमद नबी, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, अभिषेक शर्मा, विजय शंकर, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धीमान साहा, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, रशीद खान, बॅसिल थम्पी, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १