मोटारस्पोर्ट्स म्हटले की दिल्ली, हरियाणा, पंजाब या राज्यांची मक्तेदारी असते. मात्र राजस्थानमध्ये सुरू असलेल्या मारुती सुझुकी डेझर्ट स्टॉर्ममध्ये औरंगाबादच्या नऊ रॅलीपटूंनी महाराष्ट्राचा झेंडा रोवला आहे. गाडय़ांची निर्मित्ती आणि विक्रीसाठी नावारूपाला आलेल्या औरंगाबादने मोटारस्पोर्ट्ससारख्या खेळातही आपण तेवढेच सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे.
इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेल्या औरंगाबादने मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांना मागे टाकत मोटारस्पोर्ट्ससारख्या आव्हानात्मक आणि आर्थिकदृष्टय़ा महागडय़ा खेळात मोहोर उमटवली आहे. अमित कुलकर्णी याचा स्वत:चा व्यवसाय आहे तर त्याचा सहकारी प्रमोद राठोड हा राजकीय नेता आहे. टीव्हीच्या माध्यमातून त्यांना मोटारस्पोर्ट्सची ओळख झाली. त्यानंतर या खेळाचा थरार अनुभवण्यासाठी या रॅलीमध्ये हे दोघेही सहभागी झाले. ‘‘रॅलीमध्ये धोका निश्चित आहे, मात्र हे धोके ओलांडत रॅली पूर्ण करण्याचे समाधान अनोखे असते,’’ असे प्रमोद-अमित सांगतात. या जोडगोळीकडे ‘रेड दी हिमालय’ या लेह-लडाख परिसरात रंगणाऱ्या शर्यतीचा अनुभव आहे. ‘‘रॅलीत सहभागी होण्याचा खर्च काही लाखांमध्ये आहे मात्र लोक युरोप-मलेशिया दौऱ्यासाठी पैसा खर्च करतात, आम्ही थोडय़ा हटके पद्धतीच्या सहलीत सहभागी होतो,’’ असे अमितने सांगितले.
सदानंद गोडसे आणि सूर्यकांत राजूरकर ही औरंगाबादची जोडीसुद्धा या शर्यतीत सहभागी झाली आहे. ‘‘यंदा मी पहिल्यांदाच एक्स्ट्रिम या सर्वात खडतर प्रकारातून सहभागी होत आहे. याआधी मी एन्डय़ुरो प्रकारात सहभागी झालो होतो. सूर्यकांतसारखा सक्षम मार्गदर्शक असल्यामुळे एक्स्ट्रिम प्रकारातून खेळण्याचा निर्णय घेतला,’’ असे गोडसे म्हणाले. ‘‘सामान्य लोकांमध्ये या खेळाविषयी जागृती झालेली नाही. रॅलीची तयारी सुरू असताना लोक चंद्रावर स्वारी करायला निघाल्याप्रमाणे प्रश्न विचारतात, या खेळाच्या मूलभूत टप्प्यांविषयी सुद्धा लोकांना माहिती नाही,’’ असे गोडसे पुढे सांगतात.
औरंगाबादच्या चैतन्य राजूरकर आणि अभिजीत कुरेकर या जोडीला स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यात अपघाताला सामोरे जावे लागले. तर मोटो क्वॉड्स अर्थात मोटारबाइक गटातून सहभागी झालेल्या गणेश पखे यांच्या गाडीला तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. याव्यतिरिक्त एन्डय़ुरो गटातून रणजीत दारक आणि कुणाल नवांडर ही जोडीसुद्धा सहभागी झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा