भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीमधून राजीनामा देणारे प्रख्यात इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांच्याकडून शुक्रवारी आणखी काही गौप्यस्फोट करण्यात आले. रामचंद्र गुहा यांनी राजीनामा देण्यामागची आपली भूमिका मांडण्यासाठी राजीनामा प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना पत्र लिहले होते. सात प्रमुख मुद्द्यांचा अंतर्भाव असलेल्या या पत्रात गुहा यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात सुरू असलेल्या वादावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बीसीसीआयकडून काही राष्ट्रीय प्रशिक्षकांना विशेष वागणूक दिली जात असल्याचेही त्यांनी म्हटले. या प्रशिक्षकांना आयपीएल स्पर्धेतील संघासांठी काम करता यावे म्हणून त्यांच्यासोबत १० महिन्यांचेच करार केले जातात. याशिवाय, गुहा यांनी महेंद्रसिंग धोनी याचा अजूनही अ श्रेणीतील खेळाडुंमध्ये समावेश असण्यावरही आक्षेप घेतला आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करूनही त्याचा अ श्रेणीच्या खेळाडुंमध्ये समावेश असणे, क्रिकेटमधील मुल्यांच्यादृष्टीने हे असमर्थनीय असल्याचे त्यांनी म्हटले.
या पत्रात रामचंद्र गुहा यांनी एकूणच भारतीय क्रिकेटमधील ‘सुपरस्टार कल्चरवर’ ताशेरे ओढले आहेत. याशिवाय, भारतीय क्रिकेटमध्ये असणाऱ्या अंतर्गत वादांमुळे सुप्रीम कोर्टाने प्रशासकीय समिती नेमूनही फायदा होईल का, याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. या पत्रात त्यांनी स्थानिक स्तरावरील खेळाडुंच्या मानधनात वाढ करण्याबद्दलही सुचवले आहे. तसेच प्रशासकीय समितीत नावाजलेल्या माजी खेळाडुंच्या समावेशावरही त्यांना नाराजी व्यक्त केली. भारतीय क्रिकेट हे दिग्गज खेळाडुंच्या प्रभावाखाली ( सुपरस्टार सिंड्रोम) असल्याचा आरोप करतानाच गुहा यांनी सुनील गावस्कर, राहुल द्रविड यांच्या कार्यपद्धतीवरही तोफ डागली आहे.
रामचंद्र गुहा यांनी गुरूवारी बीसीसीआयच्या प्रशासकांच्या समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. गुहा यांनी २८ मे रोजी आपला राजीनामा प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांच्याकडे सादर केल्याचे त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. यावेळी गुहा यांच्याकडून राजीनाम्यामागचे कारण स्पष्ट करण्यात आले नव्हते. गुहा यांनी बीबीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि अन्य समिती सदस्यांना भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीत कर्णधार विराट कोहली आणि अन्य खेळाडूंना मत मांडण्याचा अधिकार देण्याविषयी शंका उपस्थित केली होती. विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याच्या निवड प्रक्रियेबाबत गुहा यांनी २५ मे रोजी पाठवलेल्या ई-मेलमध्ये भीती व्यक्त केली होती. प्रशिक्षकाची कारकीर्द उल्लेखनीय आहे, असे मतही गुहा यांनी व्यक्त केले होते. कोहली आणि संघातील सदस्यांना अवाजवी महत्त्व देऊन बीसीसीआय नवी प्रथा पाडत असल्याची भीतीही गुहा यांनी व्यक्त केली होती.
गुहा हे प्रशिक्षकाची निवड करण्याच्या प्रक्रियेच्या विरोधात नव्हते, मात्र खेळाडूंनी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्ही एस लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीवर प्रभाव टाकू नये, असे त्यांना वाटत होते. कर्णधार आणि प्रशिक्षक हे समालोचकाची निवड करीत आहेत आणि त्यांना प्रशिक्षकाची निवड करण्याचा अधिकार दिल्यास ते लवकरच निवड समितीचे सदस्यही ठरवतील, इतकेच नव्हे तर मुख्य कार्यकारी अधिकारीही ठरवतील, असे गुहा यांना वाटत होते, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.