नेदरलँडमध्ये सुरु असलेल्या हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकत मोठ्या धडाक्यात सुरुवात केली. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा आघाडीचा खेळाडू रमणदीप सिंह गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. रमणदीपच्या एमआरआय चाचणीमध्ये गुडघ्याला झालेली दुखापत गंभीर असल्याचं समजल्यानंतर, संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.

“पाकिस्तानविरुद्ध सामन्यादरम्यान रमणदीप गुडघ्यात दुखत असल्याचं बोलत होता. त्यामुळे अर्जेंटीनाविरुद्ध सामन्यात आम्ही त्याला विश्रांती देऊन त्याची वैद्यकीय चाचणी घेतली. या चाचणीत त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीचं निदान समोर आलेलं आहे.” भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी रमणदीपच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. त्यामुळे रमणदीपच्या अनुपस्थितीत अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलँड यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणार आहे.

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात रमणदीपने मोलाचा वाटा उचलला होता. ललित उपाध्यायने ६० व्या मिनीटाला गोलमध्येही रमणदीपने मोलाची भूमिका बजावली होती. रमणदीप हा संघाचा महत्वाचा हिस्सा आहे, त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये आम्हाला त्याची उणीव नक्की जाणवेल. मात्र त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे तो संघाबाहेर जाणं गरजेचं असल्याचं हरेंद्रसिंह म्हणाले.

Story img Loader