सलामीच्या सामन्यात पराभवाची नामुष्की पत्करावी लागल्यानंतर इंग्लिश प्रीमिअर लीगमधील बलाढय़ समजल्या जाणाऱ्या चेल्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी पुनरागमन केले. चेल्सीने एकतर्फी झालेल्या सामन्यात स्टीऊआ बुचारेस्ट संघावर ४-० अशी सहज मात केली. या विजयासह चेल्सी ‘ई’ गटात दुसऱ्या स्थानावर आहे.
युरोपा लीग विजेत्या चेल्सीने या सामन्यात जोमाने पुनरागमन केले. रामिरेसने २०व्या मिनिटाला गोलशून्यची कोंडी फोडत चेल्सीला आघाडीवर आणले. पहिल्या सत्राचा खेळ संपण्यास एक मिनिट शिल्लक असताना स्टीऊआचा बचावफळीतील खेळाडू डॅनियल जिओर्जीव्हस्की याने स्वत:च्याच गोलजाळ्यात चेंडू ढकलत चेल्सीची आघाडी २-०ने वाढवली. रामिरेसने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच तिसऱ्या गोलाची भर घातली. त्यानंतर फ्रँक लॅम्पार्डने ९०व्या मिनिटाला गोल करत चेल्सीच्या विजयावर मोहोर उमटवली. शाल्के फुटबॉल क्लबने बसेल एफसीवर १-० असा विजय मिळवून ई गटात सहा गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. ज्युलियन ड्राक्सलर याने ५४व्या मिनिटाला केलेला गोल शाल्के संघाच्या विजयात निर्णायक ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा