पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर भारताच्या गोलंदाजीवर मोठा दावा केला आहे. भारताने आपल्या गोलंदाजीचे आक्रमण पाकिस्तानप्रमाणेच तयार केले आहे, असे त्याने म्हटले आहे. माजी क्रिकेटपटूने आपला दावा सार्थ ठरवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांमधील समानतेची उदाहरणे देखील दिली आहेत.
भारताने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका २-१ अशी जिंकली आहे. तिसऱ्या टी२० सामन्यात, हार्दिक पांड्या अँड कंपनीने न्यूझीलंडविरुद्ध १६८ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत भारतीय संघाने प्रत्येक विभागात उत्कृष्ट कामगिरी दाखवली. अशा परिस्थितीत भारताच्या या विजयाने पाकिस्तानचा माजी कर्णधार खूपच प्रभावित झाला आहे. भारताकडून कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. भारतीय गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा याने एक हास्यास्पद दावा केला आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजाही भारतीय गोलंदाजीवर खूप खूश आहे, मात्र त्याने यावर मोठा दावा केला आहे. पाकिस्तानच्या धर्तीवर भारताने आपले गोलंदाजी आक्रमण तयार केल्याचे त्याने म्हटले आहे. रमीझ राजा यांनी त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर सांगितले, “मला अनेकदा असे वाटते की भारताने पाकिस्तानकडे पाहिले आणि पाकिस्तानी मॉडेलचे अनुकरण करत त्यांच्या गोलंदाजीची रचना त्याच पद्धतीने केली. उमरान मलिककडे हारिस रौफसारखा वेगवान वेग आहे, अर्शदीप सिंगनेही शाहीन आफ्रिदीसारखा डावखुरा कोनचा अँगल आणला आहे.”
रमीझ राजा पुढे म्हणाले, “वसीम ज्युनियर मधल्या षटकांमध्ये जे काम करतो तेच काम भारतासाठी हार्दिक पांड्या करतो. यासोबतच दोघांचा वेगही सारखाच आहे. शिवम मावी सहाय्यक गोलंदाजाच्या भूमिकेत आहे. भारताचा फिरकी विभाग पाकिस्तानपेक्षा थोडा चांगला आहे. मी जेव्हा जेव्हा दोन्ही बाजूंचा खेळ पाहतो तेव्हा मला नेहमी वाटते की पाकिस्तानला काय सुधारण्याची गरज आहे.” यावर टीम इंडियाच्या चाहत्यांनी जोरदार कमेंट्स करत हास्यास्पद विधान, अजब वक्तव्य, तसेच ऑस्ट्रेलियात झालेल्या भारत- पाकिस्तान सामन्यातील हारिस रौफला मारलेल्या षटकारांची आठवण देखील करून दिली.