Najam Sethi New PCB Chairman: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नजम सेठी आता खुर्ची सांभाळतील. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नजम सेठी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांची मालिका गमावली होती. त्यानंतर रमीज राजा यांची खुर्ची जाऊ शकते, अशी चर्चा होती.
इंग्लंड मालिकेदरम्यानच माजी बोर्ड सदस्यांच्या नेतृत्वाखालील गटाने रमीज यांना पीसीबीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मोहीम सुरू केली होती. पडद्यामागे काही खेळ खेळला जात असल्याचा दावा या गटाने केला. पीसीबीमधील बदलांसाठी देशाच्या कायदा मंत्रालयाने बोर्डाचे संरक्षक पंतप्रधान यांचीही भेट घेतली होती.
इम्रान खान यांनी रमीज राजा यांना अध्यक्ष केले
२०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खानच्या पक्षाने बहुमत मिळविले तेव्हा नजम सेठी यांनी पीसीबी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पीसीबी बोर्डाच्या घटनेनुसार, अध्यक्षपदासाठी उमेदवारांची नियुक्ती पंतप्रधान करतात. यानंतर, ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’ त्यांच्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करते. रमीज राजाला २०२१ मध्ये पीसीबीचे अध्यक्ष बनवण्यात आले.
इम्रान खान यांच्यानंतर शाहबाज शरीफ देशाचे पंतप्रधान झाल्यावर रमीज राजा यांची खुर्ची जाऊ शकते, असे मानले जात होते. मात्र, रमीजने आपली खुर्ची बराच काळ टिकवण्यात यश मिळवले. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघाची खराब कामगिरी आणि अनेक आरोपांनंतर त्याला हटवण्यात आले.
रमीज राजा आपल्या वक्तव्यामुळे वादात राहिले
काही दिवसांपूर्वी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी २०२३च्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेण्याबाबत बोलले होते. भारतीय संघ २०२३ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जय शाह यांनी सांगितले होते. या स्पर्धेसाठी तटस्थ ठिकाण निश्चित केले जाईल. यानंतर रमीज राजाने पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकामधून संघाचे नाव मागे घेण्याची धमकीही दिली. मात्र, लोकांना असेच उत्तर हवे असल्याचे त्यांनी नंतर सांगितले.
पीसीबीला मिळाला नवा अध्यक्ष दरम्यान
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी नजम सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पीसीबीचे मावळते अध्यक्ष रमीज राजा यांनी बीसीसीआयला इशारा देत भारतात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. जर भारतीय संघ आगामी आशिया चषकासाठी पाकिस्तानात आला नाही तर पाकिस्तानी संघ देखील भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकावर बहिष्कार टाकेल अशी धमकी राजा यांनी दिली होती. यानंतर त्यांनी मवाळ भूमिका घेत भारत आणि पाकिस्तान यांची कसोटी क्रिकेटला गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते.