Ramiz Raja on Team India vs Bangladesh Win: भारताने दुस-या आणि अंतिम कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी बांगलादेशचा सात गडी राखून पराभव करत दोन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. बांगलादेशने दिलेल्या ९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीच्या ५८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर शानदार विजय मिळवला. दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने ४५ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५१ धावा करत अर्धशतक झळकावले. तर विराट कोहलीने ३७ चेंडूत ४ चौकारांसह २९ धावांची खेळी केली. १७.२ षटकांत तीन गडी गमावून ९८ धावा करून भारताने सहज विजयाची नोंद केली. भारताच्या या विजयावर रमीझ राजा यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

भारताच्या विजयावर रमीझ राजा म्हणाले, टीम इंडियाने हा सामना सहज जिंकला, सध्याच्या घडीला घरच्या मैदानावर पराभूत करण्यासाठी सर्वात कठीण संघ म्हणजे टीम इंडिया आहे यात शंका नाही. पण महत्त्वाचं म्हणजे टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली विदेशी संघांच्या घरच्या मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये फक्त तगडी टक्करच देत नाहीत तर त्या खेळपट्टींवर विजयही मिळवत आहेत. याचमुळे भारतीय संघाचा दबदबा निर्माण झाला आहे.

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताची मोठी झेप, अंतिम फेरीसाठी दावेदारी मजबूत

रमीझ राजा यांनी भारतीय संघाच्या कौतुकानंतर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या कौतुकाचे पूल बांधले. अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना रवींद्र जडेजाबरोबर १९८ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. अश्विनने त्याच्या कारकिर्दीतील सहावे कसोटी शतक झळकावले. त्यानंतर अश्विनने दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरी करत भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

हेही वाचा – IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?

एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचे (अश्विनचे) कौतुक झाले पाहिजे तितके होते नाही. आपण त्याचे विक्रम पाहिले तर तो कोणत्याच खेळाडूपेक्षा कमी नाहीय… जरी तो १२ वा खेळाडू म्हणून किंवा संघाबाहेरही असेल तरी त्याची यावर कोणतीच नाराजी नसते. तो संघासाठी काय योग्य आहे काय परिस्थिती आहे आणि त्याची काय भूमिका आहे हे नीट समजून घेतो. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तेव्हा तो उत्कृष्ट कामगिरी करून दाखवतो, असे रमीझ राजा म्हणाले. “जडेजाचंही सारखंच, तो नेहमीच अडचणीच्या वेळेस संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.”