पाकिस्तान संघाला नुकतेच इंग्लिश संघाविरुद्ध ऐतिहासिक पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीज राजा यांनाही आपले पद गमवावे लागले आहे. पाकिस्तान सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. त्यांच्या जागी नजम सेठी यांनी पदभार स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. १५ महिन्यांपासून कार्यरत असलेल्या रमीज राजा यांनी या प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे.
पीसीबीच्या मुख्य अध्यक्ष पदावरून बडतर्फ केल्यानंतर आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याचा खुलासा त्यांनी सोशल मीडियावर केला आहे. त्यांनी याबद्दल लिहिले की, “या लोकांनी मला माझे सामानही नेऊ दिले नाही, आमच्या क्रिकेट बोर्डात आल्यानंतर हे असे घडते. सकाळी ९ वाजता १७ जणांनी कार्यालयावर धाड टाकली. जणू काही पाकिस्तानी फेडरल एजन्सीने (FIA) कार्यालयावर छापा टाकला होता. त्याशिवाय करार संपण्यापूर्वीच आपल्याला काढून टाकण्यात आल्याबद्दल राजा यांनी आगपाखड केली. पाकिस्तानचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असताना हे केले गेले आहे.
फक्त एकाच व्यक्तीसाठी राज्यघटना बदलली – रमीज राजा
रमीज राजा म्हणाले, “तुम्ही फक्त एका व्यक्तीला आणण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची संपूर्ण घटना बदलली. नजम सेठींना सामावून घेण्यासाठी तुम्हाला राज्यघटना बदलावी लागली असे मी जगात पाहिले नाही. हंगामाच्या मध्यावर, जेव्हा संघ पाकिस्तानला भेट देत असतात, तेव्हा तुम्ही ते केले. तोही तुम्ही मुख्य निवडकर्ता बदलला. मोहम्मद वसीम चांगली कामगिरी करत होता की नाही हा मुद्दा पूर्व चाचणीचा आहे. तुम्ही क्रिकेटपटू आणि त्याच्या खेळीकडे आदराने बघायला हवे होते.”
नजम सेठींवररमीज राजांनी साधला निशाना
नजम सेठींवर निशाणा साधत रमीज राजा म्हणाले, “हे नजम सेठी दुपारी २.१५ वाजता ट्विट करत आहेत की रमीज राजाला हटवण्यात आले आहे. माझे अभिनंदन करण्यास सुरुवात करा. मी कसोटी क्रिकेट खेळलो आहे, हे माझे क्षेत्र आहे. क्रिकेटबाहेरील हे लोक मसिहासारखे वागण्याचा प्रयत्न करताना पाहून वाईट वाटते. मला माहित आहे की त्याचे हेतू क्रिकेटविरहित आहेत. हे लोक प्रसिद्धीसाठी आले आहेत. यातून फक्त आणि फक्त पाकिस्तान क्रिकेटचे नुकसान होणार आहे.”