Sourav Ganguly Biopic Updates: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर चित्रपट बनवण्याच्या बातम्या सातत्याने चर्चेत होत्या. आता काही मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर गांगुलीचा बायोपिक बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की सौरव गांगुलीने त्याच्या बायोपिकच्या स्क्रिप्टला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होऊ शकते.
या चित्रपटात रणबीर कपूर सौरव गांगुलीची भूमिका साकारणार आहे. त्याच्याशिवाय इतर क्रिकेटपटूंची भूमिका कोण साकारणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटात एमएस धोनीची भूमिकाही दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
टीम इंडियाला दिली आक्रमक शैली –
सौरव गांगुली हा भारतीय संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. भारतीय संघाला आक्रमक शैली देण्याचे श्रेय त्याला जाते. संघात त्याने नेहमीच तरुणांना संधी दिली. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, हरभजन सिंग आणि इरफान पठाण सारखे खेळाडू त्याने शोधलेले हिरे आहेत. त्या काळात गांगुली त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जायचा.
सौरव गांगुलीच्या नावावर अठरा हजारहून अधिक धावांची नोंद –
सौरव गांगुली कर्णधार म्हणून खूप यशस्वी होता, त्यासोबतच तो फलंदाज म्हणूनही खूप यशस्वी होता. सौरव गांगुलीने आपल्या कारकिर्दीत १८ हजारांहून अधिक धावा केल्या. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८ शतके आणि १०७ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात त्याची फलंदाजीची सरासरी ४१+ आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत १३२ विकेट्सही घेतल्या आहेत.
कमबॅक किंग गांगुली –
सौरव गांगुली त्याच्या वारंवार पुनरागमनासाठी देखील ओळखला जातो. खरे तर कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात फॉर्मात नसल्यामुळे त्याला अनेकवेळा संघातून वगळण्यात आले, परंतु प्रत्येक वेळी त्याने दमदार पुनरागमन केले. आयपीएलमध्येही त्याने काही प्रसंगी असेच पुनरागमन केले. त्या काळात त्याला कमबॅक किंग हे नावही देण्यात आले होते.