भारताची मध्य आघाडीरक्षक खेळाडू राणी रामपालकडे प्रशिक्षकाचीही जबाबदारी सोपविली जाणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) सहायक प्रशिक्षकपदी तिची नियुक्ती केली आहे.
हरयाणाच्या राणी रामपाल हिने २०१० मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्या वेळी ती अवघी १५ वर्षांची होती. त्यानंतर ती भारतीय संघाची अविभाज्य घटक बनली. तिने चॅम्पियन्स स्पर्धेत कझाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चार गोल नोंदविले होते. या स्पर्धेतील सवरेत्कृष्ट युवा खेळाडूचे पारितोषिक तिला देण्यात आले. तसेच २०१० मध्ये तिला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघातर्फे दिला जाणाऱ्या सवरेत्कृष्ट युवा महिला खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. २०१३ मध्ये भारतीय संघाने कनिष्ठ गटाच्या विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. या यशात तिने केलेल्या आक्रमक खेळाचा मोठा वाटा होता.
राणी रामपाल ही सध्या भारताची भरवशाची खेळाडू आहे. तिने नुकत्याच झालेल्या जागतिक हॉकी लीग (उपांत्य फेरी) मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. तिच्या कामगिरीमुळेच भारतीय संघास ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिची कामगिरी लक्षात घेऊनच युवा खेळाडूंना ती चांगल्या रीतीने मार्गदर्शन करू शकेल, असे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने एका पत्रकात म्हटले आहे.

Story img Loader