राणी रामपाल, भारतीय हॉकी संघाची कर्णधार
आशियाई स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदलला आहे. पुढील वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व विश्वचषक स्पर्धा ही महत्त्वाची आव्हाने असल्यामुळे आमच्यासाठी ते वर्ष खऱ्या कसोटीचे आहे. या प्रत्येक स्पर्धामध्ये पदक मिळवण्याचे आमचे ध्येय आहे, असा निर्धार भारतीय संघाची कर्णधार राणी रामपालने व्यक्त केला.
जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत राणीच्या नेतृत्वाखाली भारताला बऱ्याच कालावधीनंतर सुवर्णपदक मिळवता आले. या विजेतेपदाबरोबरच भारताने विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेशही मिळवला आहे. त्यामुळे या संघाकडून मोठय़ा अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. हरयाणाच्या या खेळाडूने खूप संघर्ष करीत हॉकीमध्ये कारकीर्द घडवली आहे. राणीच्या कारकीर्दीविषयी आणि भारतीय संघाच्या कामगिरीबाबत केलेली खास बातचीत-
आशियाई स्पर्धेतील विजेतेपद अनपेक्षित होते काय?
अव्वल दर्जाची कामगिरी करण्याचे आमचे ध्येय होते. साखळी गटातील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर आमचा आत्मविश्वास उंचावला. चीनला आम्ही साखळी गटात सहज हरवले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात पुन्हा ते आमच्यासमोर आल्यानंतर आम्ही निश्वास टाकला होता. अर्थात चीनच्या खेळाडू केव्हाही सामन्याला कलाटणी देतात, याची खात्री असल्यामुळे आम्ही त्यांच्याबाबत सावध पवित्रा घेतला होता. पेनल्टी शूटआऊटद्वारे आम्ही जिंकलो. त्यावेळी आम्हाला ‘चक दे इंडिया’ चित्रपटाची आठवण झाली होती. विजेतेपदाबरोबरच विश्वचषकातील शानदार प्रवेशामुळे आम्हाला जास्त समाधान मिळाले.
संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्याबाबत काय सांगता येईल?
आमच्यासाठी हरेंद्र सिंग हे नवखे असले तरी त्यांनी आशियाई स्पर्धेपूर्वी जी मेहनत करून घेतली, त्याची तुलना कशाशीही होणार नाही. संघाचे अगोदरचे प्रशिक्षक शोर्ड मरीन यांनी आमचा संघ चांगला बांधला होता. त्यामुळे हरेंद्र सिंग यांना अडचण आली नाही. मुख्य म्हणजे प्रशिक्षक व संघातील सर्व खेळाडू यांच्यात उत्तम सुसंवाद असेल तर संघाची कामगिरी सर्वोच्च होते, याचाच प्रत्यय आला. हरेंद्र सिंग यांनी आम्हा खेळाडूंमध्ये असलेल्या गुणांना व कौशल्यास योग्य दिशा दिली.
पुढील वर्षांतील महत्त्वाच्या स्पर्धासाठी काय नियोजन केले आहे?
आमच्या विजेतेपदामध्ये हॉकी इंडिया व केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या सहकार्याचा मोठा वाटा आहे. आगामी स्पर्धाकरिता हॉकी इंडियाकडून परदेशामधील विविध स्पर्धात्मक सरावाचे नियोजन केले जात आहे. शासनाकडूनही भरपूर मदत मिळणार आहे. या सर्वच स्पर्धाकरिता खेळाडूंची तंदुरुस्ती महत्त्वाची असल्यामुळे सराव शिबिरांमध्ये तसेच दुखापती कशा टाळता येतील, यावर अधिक भर दिला जाणार आहे. जरी आम्ही आशियाई विजेतेपद मिळवले असले तरी आमच्यातही काही उणिवा होत्या. आम्ही कुठे कमी पडतो, पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्याचे तंत्र, बचाव फळीतील भक्कम कामगिरी, सांघिक कौशल्य, यावरही सरावाच्या वेळी विशेष भर दिला जाणार आहे.
आजपर्यंतच्या कारकीर्दीचे श्रेय कुणाला देशील?
माझ्या यशस्वी कारकीर्दीचे श्रेय पालकांना तसेच माझे गुरू बलदेव सिंग यांना द्यावे लागेल. माझे वडील घोडागाडी चालवतात, याचा मला व त्यांनाही अभिमान वाटतो. आता मला चांगले मानधन मिळत असले तरी त्यांनी त्यांचा व्यवसाय सोडलेला नाही. घरची स्थिती हलाखीची होती. स्टिक, बूट घेणे आम्हाला परवडत नव्हते. माझ्याकडील नैपुण्य पाहून बलदेवसरांनी मला सर्व सुविधा मिळवून दिल्या. अजून भरपूर स्वप्ने पूर्ण करायची आहेत.
फाईव्ह-अ-साईड स्पर्धेबाबत काय सांगता येईल?
आमचा खेळ लोकप्रिय करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. त्याचप्रमाणे मिश्र संघात खेळताना आम्हाला आवडते. पुरुष खेळाडूंकडून आम्हाला विविध तंत्राची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारची हॉकी कोणत्याही इनडोअर स्टेडियममध्ये खेळली जाऊ शकते. साहजिकच पाऊस किंवा कडक उन्हाचा त्रास होणार नाही. तसेच अशा प्रकारात खूप वेगवान चाली करण्यास संधी असल्यामुळे हा प्रकार लोकाभिमुख होईल अशी मला खात्री आहे.