पीटीआय, मुंबई

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ रविवारपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भाचा सामना करणार आहे. यावेळी मुंबईचे लक्ष्य आपले ४२वे रणजी जेतेपद मिळवण्याचे राहील.

रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली होती. सध्या तो राष्ट्रीय संघाबाहेर आहे व स्थानिक क्रिकेटमध्येही त्याला छाप पाडता आलेली नाही. मात्र, त्याला कमी लेखण्याची चूक प्रतिस्पर्धी संघ करणार नाही. रहाणेने सध्याच्या रणजी हंगामात १३.४च्या सरासरीने १३४ धावा केल्या आहेत. मुंबईचा रणजी करंडक स्पर्धेतील हा ४८वा अंतिम सामना आहे. जायबंदी सूर्यकुमार यादव व इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणारा सर्फराज खान या सामन्यात खेळणार नाही. श्रेयस अय्यर या सामन्यासाठी उपलब्ध असेल. अय्यरला रणजी करंडक स्पर्धेत सहभागी न झाल्याने ‘बीसीसीआय’चा वार्षिक करार गमवावा लागला होता. त्यामुळे निर्णायक सामन्यात त्याचा प्रयत्न मोठी खेळी करण्याचा राहील.

हेही वाचा >>>मुंबई इंडियन्सच्या नव्या गोलंदाजाची टी-२० मध्ये हॅटट्रिक, IPL पूर्वीच केला धमाका

मुंबईला दोन जेतेपदे मिळवणाऱ्या विदर्भकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. कारण, निर्णायक क्षणी संघाने आपली कामगिरी उंचावली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १५०हून अधिक बळी मिळवणारा उमेश यादव नव्या चेंडूने मुंबईच्या फलंदाजांसमोर आव्हान उपस्थित करू शकतो. मुंबईच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. मात्र, तळाच्या फलंदाजांनी संघासाठी निर्णायक कामगिरी केली आहे. यष्टिरक्षक फलंदाज हार्दिक तामोरे (२५२ धावा), तनुष कोटियन (४८१ धावा), शम्स मुलानी (२९० धावा) व तुषार देशपांडे (१६८ धावा) यांनी आपले योगदान दिले आहे. शार्दूल ठाकूरने मुंबईसाठी गेल्या सामन्यात निर्णायक फलंदाजी केली होती. १९ वर्षांखालील भारतीय संघात असलेला मुशीर खान चांगल्या लयीत आहे. त्यामुळे विदर्भच्या गोलंदाजांना आव्हान राखायचे झाल्यास चांगली कामगिरी करावी लागेल.

दुसरीकडे, विदर्भच्या संघाने सर्वच विभागात चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या फलंदाजांनी मोठय़ा खेळी केल्या आहेत. विदर्भकडून करुण नायर (६१६ धावा), ध्रुव शोरे (५४९ धावा), अक्षय वाडकर (५३० धावा), अथर्व तायडे (५२९ धावा) व यश राठोड (४५६ धावा) यांनी संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. गोलंदाजीत आदित्य सरवटे (४० बळी) व आदित्य ठाकरे (३३ बळी) यांनी चमकदार कामगिरी केली आहे.

तळाच्या फलंदाजांची कामगिरी ही संघासाठी नेहमीच फायद्याची असते. मुंबईच्या खेळाडूंनी ते सातत्याने केले आहे. मुंबईतील अनेक खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करावे असे मला वाटते. कर्णधार म्हणून त्यांना स्वातंत्र्य देऊन त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असते. अंतिम सामन्यातही सर्वाकडून हीच अपेक्षा राहील.- अजिंक्य रहाणे, मुंबईचा कर्णधार

कोणता खेळाडू कधी चमक दाखवेल हे सांगता येत नाही. अंतिम सामन्याच्या दृष्टीने आम्ही पृथ्वी, श्रेयस, शार्दूल व अजिंक्यविरुद्ध रणनीती तयार केली आहे. प्रत्येक खेळाडूकरिता आम्ही योजना आखली आहे. अंतिम सामन्यात कोणत्याही खेळाडूला कमी लेखण्याची चूक करता येत नाही.-अक्षय वाडकर, विदर्भचा कर्णधार

’ वेळ : सकाळी ९.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-खेल, जिओ सिनेमा.

Story img Loader