गेल्या काही वर्षांमध्ये जेवढी गर्दी आयपीएलच्या सामन्यांना होते, तेवढी स्थानिक सामन्यांना होताना दिसत नव्हती. त्यामुळे स्थानिक सामन्यांमध्ये काही तरी बदल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) अपेक्षित होता. बीसीसाआयने बैठकीनंतर मंगळवारी स्थानिक स्पर्धेबाबतचे काही महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. त्यानुसार रणजी करंडक स्पर्धा आता आठवडय़ांच्या शेवटी खेळवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या सामन्यानंतरच्या सामन्यांमध्ये चार दिवसांची विश्रांती देण्याचा निर्णयही यावेळी बीसीसीआयच्या वेळापत्रक समितीने घेतला आहे.
सोमवारी बीसीसीआयच्या वेळापत्रक समितीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी स्थानिक स्पर्धाबाबत काही निर्णय घेण्यात आले. तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार आठ साखळी सामन्यांपैकी चार सामने बाहेर खेळवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या वेळापत्रक समितीची सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये स्थानिक स्पर्धामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हे सारे बदल ८ जुलैपर्यंत आमच्या संकेतस्थळावर पाहता येऊ शकतील, असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.
तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार विजय हजारे करंडकाचे बाद फेरीचे सामने आणि देवधर करंडकाचे सामने दिवस-रात्र खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर २५ वर्षांखालील संघांचे सामने रणजी सामन्याच्या एकादिवसानंतर सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला. २५ वर्षांखालील खेळाडूला रणजीमध्येही सहभागी होता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर एकदिवसीय सामन्यांमध्ये बोनस गुण देण्यात येणार नसल्याचा निर्णयही या समितीने घेतला आहे.
बीसीसीआयच्या वेळापत्रक समितीने संघांचे तीन गट केले असून पहिल्या गटात रणजी विजेत्या मुंबईसह दिल्ली आणि पंजाबचे संघ आहे.
गट पुढील प्रमाणे
‘अ’ गट : मुंबई, पंजाब, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, ओरिसा, हरयाणा, विदर्भ आणि झारखंड.
‘ब’ गट : सौराष्ट्र, सेवादल, उत्तर प्रदेश, रेल्वे, बडोदा, मध्य प्रदेश, बंगाल, तामिळनाडू आणि राजस्थान.
‘क’ गट : हैदराबाद, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, केरळ, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि त्रिपुरा.