अनुभवी क्रिकेटपटूंचा भरणा असलेल्या मुंबई संघाचे अनुभवी खेळाडूंची उणीव प्रकर्षांने जाणवणाऱ्या बडोद्याविरुद्ध होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पारडे जड मानले जात आहे. ४०व्या रणजी करंडकाच्या दिशेने कूच करणाऱ्या मुंबईला रविवारपासून वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार आहे.
सचिन तेंडुलकर, कर्णधार अजित आगरकर आणि सलामीवीर वासिम जाफर या सर्वात अनुभवी क्रिकेटपटूंच्या समावेशामुळे मुंबईची बाजू भक्कम आहे, तर बडोद्याला अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल या अनुभवी खेळाडूंची उणीव जाणवणार आहे. नोव्हेंबर महिन्यात विदर्भाविरुद्ध झालेल्या सामन्यात बोटाला दुखापत झाल्यामुळे युसुफ पठाण उर्वरित सामन्यात खेळू शकला नव्हता, पण मुंबईविरुद्ध तो बडोदा संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. मुंबईलाही अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज झहीर खान यांच्याशिवाय खेळावे लागणार आहे. रोहित आणि रहाणे पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गुजरातविरुद्धच्या गेल्या सामन्यात झहीरच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले.
या तिघांच्या अनुपस्थितीतही मुंबईची बाजू मजबूत आहे. सचिन तेंडुलकरसह फॉर्मात असलेला फलंदाज अभिषेक नायर (८ सामन्यांत ७३० धावा), वासिम जाफर (४ सामन्यांत ५०५ धावा), हिकेन शाह (७ सामन्यांत ६३० धावा) आणि युवा सलामीवीर कौस्तुभ पवार (७ सामन्यांत ४५७ धावा) तसेच यष्टिरक्षक-फलंदाज आदित्य तरे (८ सामन्यांत ६२८ धावा) यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आगरकर आणि धवल कुलकर्णी यांच्यावर वेगवान गोलंदाजीची भिस्त आहे. त्यांना जावेद खानची साथ मिळू शकते. नायरने आतापर्यंत १६ बळी मिळवले असून संघाला ‘ब्रेक-थ्रू’ मिळवून देण्याची क्षमता त्याच्यात आहे. फिरकीपटू अंकित चव्हाणने २८ विकेट्स मिळवल्या असून ६ सामन्यांत पाच बळी मिळवता आलेल्या ऑफ स्पिनर रमेश पोवारसमोर संघातील आपले स्थान टिकवण्याचे आव्हान असेल.
बडोद्यातर्फे अंबाती रायुडू (७ सामन्यांत ५५८ धावा), आदित्य वाघमोडे (८ सामन्यांत ५८४ धावा), अभिमन्यू चव्हाण (८ सामन्यांत ५६६ धावा) आणि सौरभ वाकस्कर (८ सामन्यांत ३३७ धावा) यांनी सुरेख फलंदाजी केली आहे. केदार देवधरने निराशा केली असली तरी त्याच्याकडून मोठय़ा खेळीची बडोद्याला अपेक्षा आहे. इरफान आणि मुनाफच्या अनुपस्थितीत मध्यमगती गोलंदाज मुर्तझा वहोरा आणि भार्गव भट्ट यांच्यावर गोलंदाजीची मदार असणार आहे.
सचिन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार – आगरकर
एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर बडोद्याविरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल, असे मुंबईचा कर्णधार अजित आगरकरने स्पष्ट केले. आगरकर म्हणाला, ‘‘सचिन मुंबई संघात परतला, हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. सचिनसारख्या महान क्रिकेटपटूच्या अनुभवाचा आम्हाला फायदाच होईल.’’
बडोद्याविरुद्ध मुंबईचे पारडे जड
अनुभवी क्रिकेटपटूंचा भरणा असलेल्या मुंबई संघाचे अनुभवी खेळाडूंची उणीव प्रकर्षांने जाणवणाऱ्या बडोद्याविरुद्ध होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पारडे जड मानले जात आहे. ४०व्या रणजी करंडकाच्या दिशेने कूच करणाऱ्या मुंबईला रविवारपासून वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-01-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji mumbai favourites against zonal rivals baroda