इशांक जग्गी (नाबाद १२६) व रमीझ निमत (१००) यांची शानदार शतके व त्यांनी केलेल्या १०६ धावांच्या भागीदारीमुळेच झारखंडने पंजाबविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ६ बाद ३१० धावा केल्या. पंजाबकडून सिद्धार्थ कौल (३/६१) व सरबजित लड्डा (२/९०) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. दरम्यान, पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केल्याप्रकरणी पंजाबचा कर्णधार हरभजन सिंगच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कापण्यात येणार आहे.
सेनादलाची उत्तर प्रदेशवर १४९ धावांची आघाडी
पीटीआय, इंदूर
सेनादलाने पहिल्या डावात २६३ धावा करीत रणजी क्रिकेट उपान्त्यपूर्व लढतीत उत्तर प्रदेशवर १४९ धावांची आघाडी घेतली. दिवसअखेर उत्तर प्रदेशने दुसऱ्या डावात ४ बाद १३८ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक-उत्तर प्रदेश १३४ व ४ बाद १३८ (तन्मय श्रीवास्तव ५४, सूरज यादव ४/३३). सेनादल-२६३ (रजत पालिवाल ११२, सरबजितसिंग ४०, अंकित राजपूत ५/६१).
सौराष्ट्राचा धावांचा डोंगर
पीटीआय, राजकोट
अर्पित वासवदा याने केलेल्या नाबाद १५२ धावांच्या जोरावर सौराष्ट्र संघाने कर्नाटकविरुद्धच्या रणजी क्रिकेट उपांत्यपूर्व लढतीत पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर रचला. उर्वरित खेळात कर्नाटकने पहिल्या डावात बिनबाद ४५ धावा केल्या.