दमदार सलामीसह मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने कूच करणाऱ्या आंध्र प्रदेशचा डाव महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी रोखला. पहिल्या दिवसअखेर आंध्र प्रदेशने ३ बाद २३२ अशी मजल मारली. नाणेफेक जिंकून महाराष्ट्राने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र आंध्रच्या श्रीकर भरत आणि प्रसंथ कुमार यांनी १२२ धावांची शतकी सलामी देत महाराष्ट्राच्या झटपट विकेट मिळवण्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. डॉमिनिक जोसेफने भरतला त्रिफळाचीत केले. त्याने ११ चौकार आणि २ षटकारांसह ८२ धावा केल्या. ही जोडी फुटल्यानंतर आंध्र प्रदेशची धावगती मंदावली. गोनबटुला चिरंजीवी २२ धावांवर बाद झाला. शतकाकडे कूच करणाऱ्या प्रसंथला बाद करत जोसेफने महाराष्ट्राला आणखी एक यश मिळवून दिले. त्याने १४ चौकारांसह ८६ धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बोडापत्ती सुमंथ २४ तर मुंबईकर अमोल मुझुमदार ६ धावांवर खेळत आहेत. महाराष्ट्रातर्फे जोसेफने २ बळी घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा