आसामच्या महम्मद सईदने सात बळी घेत महाराष्ट्राचा दुसरा डाव १३४ धावांत गुंडाळला व रणजी क्रिकेट सामन्यात रंगत निर्माण केली. परंतु विजयासाठी ३४४ धावांच्या लक्ष्याला सामोरे जाताना आसामची दुसऱ्या डावात ४ बाद ९४ अशी घसरगुंडी उडाली.
पहिल्या डावात २०४ धावांची आघाडी मिळविणाऱ्या महाराष्ट्राने बिनबाद १६ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. त्यावेळी त्यांचे फलंदाज आणखी २०० धावांची भर घालतील व निर्णायक विजयाच्या दृष्टीने आपली बाजू भक्कम करतील अशी अपेक्षा होती. मात्र आसामच्या महम्मद सईद याने केवळ ५० धावांमध्ये सात बळी घेतले व महाराष्ट्राच्या आशांना सुरुंग लावला. एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची त्याची ही दुसरी वेळ आहे. अबू नेचीम याने दोन बळी घेत त्याला चांगली साथ दिली. महाराष्ट्राकडून केदार जाधव याने सर्वाधिक ३४ धावा केल्या तर संग्राम अतितकर याने २२ धावा केल्या. महाराष्ट्राचा दुसरा डाव ५७.५ षटकांमध्ये १३४ धावांवर कोसळला. महाराष्ट्राला एकूण ३४३ धावांची आघाडी मिळाली.
आसामच्या धीरज जाधव व परवेझ अझिझ यांनी सलामीसाठी ४९ धावांची भर घातली तेव्हा आसाम हा विजयासाठी प्रयत्न करीत आहेत, अशी अपेक्षा होती. मात्र सहा चौकारांसह ३१ धावा करणारा अझिझला हर्षद खडीवाले याने धावबाद केले आणि ही जोडी फुटली. त्यापाठोपाठ त्यांनी आणखी तीन विकेट्स गमावल्या. एका बाजूने झुंजार खेळ करणाऱ्या धीरजने नाबाद ३७ धावा केल्या. खेळ संपला त्या वेळी गोकुळ शर्मा (नाबाद २) हा त्याच्या साथीत खेळत होता. महाराष्ट्राकडून सात गोलंदाजांचा उपयोग करण्यात आला. त्यापैकी चिराग खुराणा, अक्षय दरेकर व पुष्कराज चव्हाण यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
आसामला विजयासाठी आणखी २५० धावांची आवश्यकता असून अजून सहा विकेट्स त्यांच्या हातात आहेत. महाराष्ट्राने पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण निश्चित केले आहेत. मात्र निर्णायक विजयासाठी त्यांना गुरुवारी झुंजावे लागणार आहे.
रणजीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांची ठिकाणे बीसीसीआयकडून निश्चित
मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या साखळी फेरीची धामधूम गुरुवारी संपणार आहे. बाद फेरीत कोणता संघ पोहोचणार, हे चित्र गुरुवारी सायंकाळी पूर्णत: स्पष्ट होईल. त्यानंतर कोणता संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार, याचा विचार न करता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सामन्यांची ठिकाणे जाहीर करणार आहे.
‘‘वानखेडे स्टेडियम (मुंबई), ईडन गार्डन्स (कोलकाता), मोदी बाग मैदान (बडोदा) आणि चिन्नास्वामी स्टेडियम (बंगळुरू) ही चार ठिकाणे उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांसाठी निश्चित करण्यात आली आहेत,’’ असे बीसीसीआयचे महाव्यवस्थापक (खेळ विकास) प्रा. रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले. ८ ते १२ जानेवारी या कालावधीत उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत. त्यानंतर १८ ते २२ जानेवारीदरम्यान उपांत्य फेरी आणि २९ ते २ फेब्रुवारीदरम्यान अंतिम फेरीचा सामना होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : ३५२ व १३४ (हर्षद खडीवाले १५, रोहित मोटवानी १०, केदार जाधव ३४, संग्राम अतितकर २२, समाद फल्लाह ११, महंमद सईद ७/५०, अबू नेचीम २/१५)
आसाम : १५२ व ४ बाद ९४ (धीरज जाधव खेळत आहे ३७, परवेझ अझिझ ३१).