रणजीच्या रणधुमाळीत मुंबई-महाराष्ट्राची अस्सल ‘ठस्सन’ पहायला मिळत आहे. मुंबईचा पहिला डाव ४०२ धावांवर संपुष्टात आला आहे. मुंबईच्या आव्हानाला सामोरे जाण्यास महाराष्ट्राचे सलामीवीर सज्ज झाले असून अनुभवी गोलंदाज जहीर खानच्या गोलंदाजीवर सर्वांचे लक्ष लागून आहे.
सुरुवातीला सामन्यात महाराष्ट्राच्या गोलंदाजांचे वर्चस्व पहायला मिळाले होते, तर दुसऱया बाजूने मुंबईच्या सुर्यकुमारने शतकी खेळी साकारून तेजोमय आशेची पालवी निर्माण केली. याचप्रमाणे तीन वर्षांच्या अंतराने मुंबईकडून रणजी पुनरागमन करणाऱ्या विनीत इंदुलकरने संधीचे सोने करणारी अर्धशतकी खेळी साकारली. त्यामुळेच गतविजेत्या मुंबई संघाला वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईला पहिल्या डावात ४०२ धावांचा टप्पा गाठता आला आहे.
आता अनुभवी गोलंदाज जहीर खानच्या भेदक माऱयाचे आव्हान महाराष्ट्र संघासमोर आहे. जहीर खानच्या गोलंदाजी खेळून आपले नाणे सिद्ध करण्याची संधी महाराष्ट्राच्या नवोदित फलंदाजांना आहे. त्यामुळे ही खेळी त्यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे.

Story img Loader