सामना जिंका आणि बाद फेरीत जा, हेच गतविजेता मुंबई आणि गुजरात यांच्यातील अखेरच्या रणजी साखळी सामन्यातील चित्र आहे. मुंबईने मोसमाची सुरुवात चांगली केली असली तरी गेल्या तीन सामन्यांमधील वाईट कामगिरीमुळे गतविजेत्या मुंबईवर सध्या तरी स्पर्धेतून बाहेर पडण्याचे संकट समोर उभे आहे. मुंबईचा दुसरा डाव २७३ धावांवर आटोपला असून त्यांनी गुजरातसमोर विजयासाठी एकूण १७५ धावांचे आव्हान ठेवले. गुजरातची तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद ६७ अशी धावसंख्या असून त्यांना विजयासाठी १०८ धावांची गरज आहे.
गुजरातने हा सामना अनिर्णित राखला तरी ते बाद फेरीत पोहोचू शकतात, त्यामुळे मुंबईला बाद फेरीत पोहोचण्यासाठी सात बळी मिळवून विजय पदरी पाडण्याशिवाय गत्यंतर नसेल.
मंगळवारच्या ४ बाद ७४ धावांवरून पुढे खेळताना मुंबईने बुधवारी आणखी १९९ धावांची भर घातली. हिकेन शाह (४८), इक्बाल अब्दुल्ला (३८) आणि प्रवीण तांबे (४२) यांनी उपयुक्त खेळी साकारत मुंबईच्या धावसंख्येत हातभार लावला.
मुंबईच्या १७५ धावांचा पाठलाग करताना गुजरातची ३ बाद २८ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर भार्गव मेरई (नाबाद १९) आणि पार्थिव पटेल (नाबाद २५) यांनी संघाचा डाव सावरला.

संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : १५४
गुजरात (पहिला डाव) : २५३.
मुंबई (दुसरा डाव) : १०३.३ षटकांत सर्व बाद २७३ (हिकेन शाह ४८; जयप्रीत बुमराह ४/६८)
गुजरात (दुसरा डाव) : २२ षटकांत ३ बाद ६७ (पार्थिव पटेल खेळत आहे २५; इक्बाल अब्दुल्ला २/११).

Story img Loader