तब्बल ४० वेळा रणजी करंडकाला गवसणी घालणारा मुंबईचा संघ पूर्वीइतका नक्कीच खडूस नसून त्यांना या वेळचे जेतेपद पटकावण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. रविवारपासून रणजी हंगामाला सुरुवात होत असून वानखेडेवर त्यांच्यापुढे जम्मू आणि काश्मीरसारख्या तुलनेने कमकुवत संघाचे आव्हान असेल. त्याचबरोबर संघातील वाद आणि राजकारण हा मुंबईसाठी सर्वात चिंतेचा विषय ठरू शकतो.
मुंबईच्या संघात सलामीवीर वसिम जाफर सोडल्यास एकही अनुभवी खेळाडू नाही. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले असून झहीर खान दुखापतीनंतर पुन्हा मैदानात परतलेला नाही. त्यामुळे वसिम वगळता मुंबईचा संघ पूर्वीएवढा बलवान नक्कीच दिसत नाही. अभिषेक नायरकडून संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. सूर्यकुमारला रणजी क्रिकेटच्या कप्तानीचा तसा फारसा अनुभव नाही.
फलंदाजीमध्ये वसिमला सलामीला न पाठवता मधल्या फळीत खेळवण्याचा प्रयोग मुंबईचा संघ करू शकतो, कारण त्याच्याभोवतीच मुंबईची फलंदाजी असेल. सूर्यकुमार हा मुळात धडाकेबाज फलंदाज आहे, तर अभिषेकला आतापर्यंत कामगिरीत सातत्य दाखवता आलेले नाही. काही युवा फलंदाजांचा संघात भरणा असून त्यांच्याकडून मोठी अपेक्षा करता येणार नाही. मुंबईच्या मधल्या फळीत तग धरून राहणारा वसिम वगळता एकही फलंदाज दिसत नाही. गोलंदाजीमध्ये धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर ही वेगवान गोलंदाजीची जोडी असेल. त्याचबरोबर डावखुरा फिरकीपटू विशाल दाभोळकरकडून मोठय़ा अपेक्षा असतील.
एकंदरीत मुंबईचा संघ पाहिला तर त्यांना बाद फेरीत पोहोचवण्यासाठी प्रशिक्षक प्रवीण अमरे यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. संघातील आणि संघाबाहेरील आव्हानांचा सामना करत ते संघाला कुठपर्यंत घेऊन जातात, याकडेच साऱ्यांचेच लक्ष असेल. जम्मू आणि काश्मीर संघाचा विचार केला, तर त्यांच्याकडे अष्टपैलू परवेझ रसूलचा अपवाद वगळता एकही खेळाडू प्रकाशझोतात आलेला नाही. त्यामुळे त्यांचा खेळ हा कर्णधार परवेझभोवतीच राहील.

आमचा खेळ हा वसिमभोवतीच गुंफलेला असेल; पण आम्ही पूर्णपणे अवलंबून नक्कीच नाही. जर त्याच्याकडून मोठी खेळी झाली नाही, तर अन्य फलंदाजांवर मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी असेल. संघातील युवा खेळाडूंकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.
सूर्यकुमार यादव, मुंबईचा कर्णधार

परवेझ रसूलला ताप आला असला तरी त्याची तब्येत चिंताजनक नसून तो रविवारच्या सामन्यात खेळणार आहे. मुंबईविरुद्ध त्यांच्याच मैदानात खेळण्यासाठी आमचा संघ आतुर आहे. विभागीय स्पर्धेमध्ये खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असून त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
– सुनील जोशी, जम्मू आणि काश्मीर संघाचे प्रशिक्षक