मध्य प्रदेशचा पहिला डाव २२७ धावांत संपुष्टात; दुसऱ्या डावात तरे, यादव शतकासमीप

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेत मुंबईने अंतिम फेरीच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. मुंबईने मध्य प्रदेशचा पहिला डाव २२७ धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर दुसऱ्या डावात कर्णधार आदित्य तरे आणि सूर्यकुमार यादव हे शतकासमीप असून तिसऱ्या दिवसअखेर मुंबईने ३ बाद २८५ अशी मजल मारून ४२९ धावांची आघाडी घेतली आहे.
रविवारच्या ५ बाद १९७ या धावसंख्येवरून पुढे खेळताना मध्य प्रदेशचा पहिला डाव २२७ धावांवर संपुष्टात आला. मध्य प्रदेशने ३० धावांमध्ये पाच फलंदाज गमावले. मध्य प्रदेशला या वेळी नमन ओझाकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. पण चौथ्याच षटकात त्याला अभिषेक नायरने बाद केले. नमनने ११ चौकारांच्या जोरावर ७९ धावांची खेळी साकारली. मुंबईकडून बलविंदरसिंग संधूने मध्य प्रदेशचा अर्धा संघ गारद केला.
दुसऱ्या डावात मुंबईला पहिल्याच षटकातील तिसऱ्याच चेंडूवर धक्का बसला. सलामीवीर अखिल हेरवाडकर भोपळा न फोडता तंबूत परतला. पण त्यानंतर श्रेयस अय्यर (५८) आणि भाविन ठक्कर (३२) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी रचली. पण दहा धावांमध्ये हे दोघेही बाद झाले. या वेळी कर्णधार आदित्य आणि सूर्यकुमार यांनी चौथ्या विकेटसाठी १९० धावांची अभेद्य भागीदारी रचली. सूर्यकुमारने १८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ९७ धावा केल्या आहेत, तर आदित्यने १५ चौकारांच्या जोरावर नाबाद ९० धावांची खेळी साकारली आहे.संक्षिप्त धावफलक
मुंबई : ३१७ आणि ७० षटकांत ३ बाद २८५ (सूर्यकुमार यादव खेळत आहे ९७, आदित्य तरे खेळत आहे ९०; पुनीत दाते १/३९)
मध्य प्रदेश : ९२.१ षटकांत सर्वबाद २२७ (नमन ओझा ७९; बलविंदरसिंग संधू ५/४३)
सौराष्ट्र अंतिम फेरीत
बडोदा : जयदेव उनाडकतच्या भेदक माऱ्याच्या जोरावर सौराष्ट्रने आसामवर १० विकेट्स राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. सौराष्ट्रने पहिल्या डावात आघाडी घेतलेल्या ११९ धावांचा पाठलाग करताना आसामला दुसऱ्या डावात १३९ धावाच करता आल्या. २१ धावांचे लक्ष्य सौराष्ट्रने सहज पार केले. संक्षिप्त धावफलक : आसाम (पहिला डाव) : २३४ व दुसरा डाव ३९.१ षटकांत १३९ (जमालुद्दीन सय्यद मोहम्मद ३९; जयदेव उनाडकत ५-४५, हार्दिक राठोड ३-२६) पराभूत वि. सौराष्ट्र (पहिला डाव): २५४ व दुसरा डाव बिनबाद २४.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy 2015 16 group b madhya pradesh set mumbai 280 run target with 2 days remaining