४१ वेळा रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईच्या संघाने यंदाच्या हंगामातही उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. आपल्या खडूस खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या संघाने घरच्या मैदानावर खेळताना दुबळ्या त्रिपुराच्या संघावर १० गडी राखून मात केली. दुसऱ्या डावात त्रिपुराच्या संघाने दिलेलं ६३ धावांचं आव्हान मुंबईच्या फलंदाजांनी ६.२ षटकात पूर्ण करुन सामना आपल्या नावे केला. पृथ्वी शॉने वादळी खेळी करत दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं, तर पहिल्या डावातला शतकवीर जय बिस्ताने त्याला १३ धावा काढून चांगली साथ दिली. या विजयासह मुंबईने ७ गुणांची कमाई केली असून, मुंबईच्या विजयाने आंध्रप्रदेशच्या संघाचं उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचं स्वप्न धुळीस मिळालं आहे.

संपूर्ण सामन्यात मुंबईचा वरचष्मा पहायला मिळाला. पहिल्या डावात २२६ धावांची आघाडी घेतलेल्या मुंबईच्या संघाने आपला डाव ४२१/८ या धावसंख्येवर घोषित केला. मात्र मुंबईच्या माऱ्यासमोर कसाबसा बचाव करत त्रिपुराने २८८ धावांपर्यंत मजल मारली. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी विजय आवश्यक असल्यामुळे मुंबईच्या फलंदाजांनी त्रिपुराने दिलेलं आव्हान झटपट पार करत विजय संपादन केला.

असा आहे सामन्याचा संक्षिप्त धावफलक –

त्रिपुरा १९५ आणि २८८ (यशपाल सिंह ८२, समित पटेल ६८; कर्ष कोठारी ४/७२, धवल कुलकर्णी ४/६९) मुंबई ४२१/८ डाव घोषीत आणि बिनबाद ६४ (पृथ्वी शॉ ५०, जय बिस्ता १३)

Story img Loader