४१ वेळा रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईच्या रणजी संघासमोर यंदा खडतर आव्हान उभं राहिलेलं आहे. या हंगामात अवघा एक विजय मिळवलेल्या मुंबईच्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवायचा असल्यास, त्यांना त्रिपुराविरुद्ध विजय मिळवणं गरजेचं बनलं आहे. क गटात मुंबई आपल्या घरच्या मैदानावर त्रिपुराविरुद्ध खेळणार आहे. त्रिपुराचा संघ मुंबईच्या तुलनेत तळाला असल्याने मुंबई या सामन्यावर वर्चस्व राखेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

अवश्य वाचा – अन्य संघांची ताकद वाढली म्हणून मुंबईचा दबदबा कमी झाला!

सध्या मुंबईचा संघ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. केवळ १ विजय आणि ४ सामने अनिर्णित राहिल्यामुळे मुंबईला यंदाच्या हंगामात तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. आंध्र प्रदेशने साखळी फेरीतले आपले सर्व सामने खेळून १९ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मध्य प्रदेशचा संघ १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबई आणि मध्य प्रदेशच्या संघाने आपल्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवल्यास, आंध्र प्रदेशचा संघ स्पर्धेबाहेर जाऊ शकतो. मात्र मुंबई आणि मध्य प्रदेश या दोन्ही संघाना सामन्याच्या अखेरीस ३ गुणांवर समाधान मानावं लागलं, तर मुंबईचं यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल. मुंबईला ३ गुण मिळाल्यास मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशच्या संघाला पुढच्या फेरीत प्रवेश मिळेल.

त्रिपुराच्या संघाचं यंदाच्या स्पर्धेतलं आव्हान हे संपलेलं आहे. आतापर्यंत त्रिपुराच्या खात्यात अवघे ४ गुण जमा आहेत. मध्य प्रदेशच्या संघाने त्रिपुरावर १० गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे अखेरच्या सामन्यात त्रिपुराचा संघ काही आश्चर्यकारक कामगिरी करेल याची शक्यता कमीच आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी मुंबईच्या संघाने अनुभवी अभिषेक नायरला संघातून वगळलं आहे. त्रिपुराविरुद्ध सामन्यासाठी असा असेल मुंबईचा संघ –

आदित्य तरे (कर्णधार), सुर्यकुमार यादव (उप-कर्णधार), श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड, मिनाद मांजरेकर, आकाश पारकर, कर्ष कोठारी, जय बिस्ता, विजय गोहील, पृथ्वी शॉ, अखिल हेरवाडकर आणि सूफीयान शेख

मुंबईच्या संघासाठी यंदाचा हंगाम फारसा चांगला राहिलेला नाहीये. भुवनेश्वरमध्ये ओडीशाविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा अपवाद सोडला, तर मुंबईचे उर्वरित सर्व सामने अनिर्णित राहिले. फलंदाजीत १८ वर्षीय सलामीवीर पृथ्वी शॉने यंदाच्या हंगामात ३ शतकं ठोकली आहेत. मात्र इतर फलंदाजांची त्याला हवीतशी साथ मिळू शकलेली नाहीये. मधल्या फळीत सिद्धेश लाडने एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. मात्र कर्णधार आदित्य तरेला अजुनही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाहीये. याचसोबत मुंबईच्या गोलंदाजांनाही घरच्या मैदानावर खेळताना चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader