मुंबईच्या पृथ्वी शॉने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. भुवनेश्वरमध्ये ओडीशाविरुद्ध रणजी सामन्यात पृथ्वी शॉने शतकी खेळी केली आहे. ५ सामन्यांमध्ये पृथ्वी शॉचं हे चौथं शतक ठरलं. ओडीशाविरुद्ध पृथ्वी शॉने १०५ धावांची खेळी केली. या खेळीत १८ चौकारांचा समावेश होता. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये याआधी सचिन तेंडुलकरच्या नावावर वयाच्या १८ व्या वर्षी सर्वाधीक शतकांची नोंद होती. पृथ्वीने ओडीशाविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत हा विक्रम मोडीत काढला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागच्या हंगामात पृथ्वी शॉने रणजी करंडक स्पर्धेत मुंबईसाठी पदार्पण केलं. यानंतर भारत ‘अ’ आणि अध्यक्षीय संघामध्येही पृथ्वीने चमकदार कामगिरी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. आपल्या पहिल्या रणजी सामन्यात शतक झळकावल्यानंतर पृथ्वीने यंदाच्या दुलीप करंडकातही पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली होती.

भारताच्या १९ वर्षाखालील संघाच्या इंग्लंड दौऱ्यात पृथ्वी शॉने आश्वासक कामगिरी केली होती. मात्र यानंतर निवड समितीने पृथ्वीला रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला देत, आशिया चषक स्पर्धेत इतर खेळाडूंना संघात जागा दिली. त्यामुळे निवड समितीने दिलेल्या या सल्ल्याचा पृथ्वीला चांगलाच फायदा झालेला दिसतोय.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy 2017 18 mumbai young batsman prithvi shaw slams 4th ton in his 5th first class match