रणजी करंडक स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाने आपल्या पहिल्या विजयाकडे एक पाऊल टाकलं आहे. ओडीशाच्या संघाला १४५ धावात ऑलआऊट करत मुंबईने पहिल्या डावात १४४ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना, मुंबईने दुसऱ्या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात ५८ धावा केल्या आहेत.

अवश्य वाचा – प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पृथ्वीच्या शतकांचा चौकार

पहिल्या दिवसाच्या अखेरीस २६४/६ या धावसंख्येवरुन खेळाची सुरुवात करताना, मुंबईने आपल्या धावसंख्येत केवळ २५ धावांचीच भर टाकली. ओडीशाकडून बसंत मोहंतीने ४ बळी घेतले. दुसरीकडे मुंबईच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना ओडीशाच्या फलंदाजांची तारांबळ उडाली. एकही धाव फलकावर लागलेली नसताना ओडीशाने आपले ३ फलंदाज गमावले. धवल कुलकर्णी आणि शार्दुल ठाकूर या जोडीने ओडीशाच्या सलामीच्या जोडीला धक्के दिले. यानंतर विजय गोहील आणि अभिषेक नायरने प्रत्येकी ३-३ बळी घेत मुंबईला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या फेरीत मुंबईची सुरुवातही काहीशी अडखळतीच झाली. सलामीवीर अखिल हेरवाडकर अवघ्या ३ धावसंख्येवर असताना माघारी परतला. यानंतर पहिल्या डावातील शतकवीर पृथ्वी शॉने दुसऱ्या डावात मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावात फारशी चमक दाखवू शकला नाही. बसंत मोहंतीने भोपळाही न फोडता त्याला माघारी धाडलं. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना ओडीशाच्या गोलंदाजांनी पृथ्वी शॉला माघारी धाडत मुंबईला तिसरा धक्का दिला. दुसऱ्या दिवसाअखेरीस मुंबईकडे २०२ धावांची आघाडी आहे.

Story img Loader