कर्णधार अंकित बावणे आणि केदार जाधव यांच्याकडून मिळालेल्या जीवदानांचा लाभ उठवित सौराष्ट्राने महाराष्ट्राविरूध्दच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी ३ बाद २६९ अशी दमदार मजल मारली आहे.  सलामीवीर हार्विक देसाई (५५) आणि स्नेल पटेल (८४) तसेच विश्वराज जडेजा (९७) यांनी अर्धशतकी खेळी करीत महाराष्ट्राची गोलंदाजी निष्प्रभ केली.

येथील अनंत कान्हेरे मैदानावर शुक्रवारपासून एलिट अ गटातील सामन्यास सुरूवात झाली. कर्णधार अंकितने नाणेफेक जिंकून सौराष्ट्राला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अंगाला झोंबणाऱ्या थंडीत हार्विक आणि स्नेल यांना प्रारंभी महाराष्ट्राच्या अनुपम संकलेचा, समद फल्लाह यांच्या गोलंदाजीला तोंड देणे कठीण जात होते. त्यातच पहिल्या तासाभराच्या खेळातच सलामीवीरांना केदार जाधव आणि अंकितकडून जीवदान मिळाले. जीवदानांचा लाभ उठवित हार्विक आणि स्नेलने जम बसवित पहिल्या गडय़ासाठी ९८ धावांची भागीदारी केली. हार्विक पायचित असल्याचा कौल अनुपम संकलेचाने मिळविल्यावर महाराष्टाच्या क्षेत्ररक्षकांना काहीसा दिलासा मिळाला. हार्विकने ९९ चेंडूत आठ चौकारांसह ५५ धावांची खेळी केली.

हार्विकनंतर मैदानात उतरलेल्या विश्वराज जडेजाने गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरूवात केली. दुसऱ्या टोकाला स्नेलनेही अर्धशतक पूर्ण केले. स्नेल-विश्वराज जोडीने १४८ धावांची भागीदारी करून सौराष्ट्राला २४६ वर नेऊन ठेवले. शतकाच्या दिशेने वाटचाल करणारी ही जोडी दिवसाचा खेळ संपण्याच्या अर्धा तास आधी तंबूत परतली. संकलेचाने आपला दुसरा बळी घेतांना स्नेलला खुराणाकडे झेल देण्यास भाग पाडले. स्नेलने २१२ चेंडूच्या संयमपूर्ण खेळीत १३ चौकारांसह ८४ धावा केल्या. तर, १५४ चेंडूत ११५ चौकार आणि एका षटकारासह ९७ धावा करणाऱ्या विश्वराजला आशय पालकरने बाद केले.

दिवसाचा खेळ संपला तेव्हां साल्ढन जॅक्सन (१२) आणि अर्पित वासवदा (११) खेळत होते. स्थानिक गोलंदाज सत्यजित बच्छाव गोलंदाजीला आल्यावर प्रेक्षकांनी त्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. सत्यजितने ११ षटकात ३७ धावा दिल्या. त्याला एकही बळी मिळाला नाही. संकलेचाने ८४ धावात दोन बळी घेतले.

Story img Loader