रेल्वेला विजयासाठी २२४ धावांची गरज; तिसऱ्या दिवसअखेर १ बाद १९
हर्ष त्यागीने घेतलेल्या ७ बळींच्या जोरावर रेल्वेने विदर्भाचा दुसरा डाव अवघ्या १४७ धावात संपुष्टात आला. पहिल्या डावातील पिछाडीमुळे २४३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या रेल्वेने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद १९ धावा केल्या असून सामन्याच्या अखेरच्या दिवशी त्यांच्यापुढे २२४ धावा करण्याचे आव्हान असल्याने सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे.
तिसऱ्या दिवशी रेल्वेच्या हर्ष त्यागीने अत्यंत तिखट मारा करीत २३ षटकांत ४१ धावा देत ७ बळी मिळवले. त्यामुळे विदर्भाचा दुसरा डाव अक्षरश: गडगडला. त्याला दुसऱ्या बाजूने अविनाश यादवने ३ बळी घेत साथ दिली. त्यामुळे विदर्भाचा दुसरा डाव १४७ धावांमध्येच संपुष्टात आला. विदर्भाकडून केवळ कर्णधार फैज फझल (२१), संजय रामस्वामी (२६) या सलामीवीरांनी आणि आदित्य सरवटे (३६) या तळाच्या फलंदाजाने अल्पसा प्रतिकार केला. मात्र पहिल्या डावातील आघाडीमुळेच विदर्भाला रेल्वेसमोर २४३ धावांचे आव्हान उभे करता आले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या रेल्वेचा सलामीवीर प्रशांत गुप्ता याला सरवटेने अवघ्या ७ धावांवर बाद केल्याने विदर्भाच्या आशा उंचावल्या आहेत. मात्र ९ गडी हातात असताना रेल्वेला अखेरच्या दिवशी २२४ धावांचेच आव्हान असून प्रथम सिंग आणि नितीन भिल्ले हे मैदानावर टिकून आहेत.
महाराष्ट्रासमोर पराभवाचे संकट
चेतन सकारियाच्या भेदक माऱ्यासमोर पहिला डाव २४७ धावांत गुंडाळला गेल्यानंतर फॉलोऑन मिळालेल्या महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावात तीन बाद १५७ धावा झाल्या असून त्यांच्याकडे केवळ सहा धावांची आघाडी आहे. येथील अनंत कान्हेरे मैदानावर सोमवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी पराभव टाळण्यासाठी फलंदाजांना झगडावे लागणार आहे. पहिल्या डावात केदार जाधवच्या ९९ धावा हे महाराष्ट्राच्या फलंदाजीचे वैशिष्टय़ ठरले.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गटातील सामन्यात सलग दुसऱ्या दिवशी १० गडी बाद झाले. हे सर्व गडी महाराष्ट्राचे आहेत. अनुपम संकलेचाला (१०३ धावांत सहा गडी बाद) आपला केवळ तिसरा रणजी सामना खेळणाऱ्या जलदगती चेतन सकारियाकडून (६३ धावांत सहा बळी) मिळालेल्या उत्तरामुळे महाराष्ट्रापुढे आता पराभवाचे संकट उभे ठाकले आहे. तीन बाद १५७ धावांवरून तिसऱ्या दिवशी केदार जाधव (नाबाद ३८) आणि कर्णधार अंकित बावणेने महाराष्ट्राचा डाव पुढे सुरू केल्यावर ४३ धावांत १४ धावा करणाऱ्या अंकितला त्रिफळाचीत करून सकारियाने हादरा दिला. त्यानंतर रोहित मोटवानी हाही ११ धावांवर तंबूत परतल्यावर केदारने राहुल त्रिपाठीच्या साथीने डाव सावरण्यास सुरुवात केली. शतकाच्या जवळ आलेला केदार बदली फिरकीपटू कमलेश मकवानाच्या चेंडूवर चकला आणि त्रिफळाचीत झाला.
केदारने १५५ चेंडूंत १२ चौकार आणि एका उत्तुंग षटकारासह ९९ धावा केल्या. त्यानंतर सत्यजीत बच्छावचा (२४ चेंडूंत २१) अपवाद वगळता तळाचे फलंदाज तग धरू न शकल्याने महाराष्ट्राचा पहिला डाव २४७ मध्ये आटोपला. सौराष्ट्राचा कर्णधार उनाडकटने महाराष्ट्राला फॉलोऑन देऊन फलंदाजीस आमंत्रित केले. त्यांनी दिवसअखेर ३ बाद १५७ धावा केल्या.