हार्दिक पंडय़ाच्या आक्रमक अर्धशतकी खेळीनंतरही यजमान मुंबईने पहिल्या डावात २९ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. रॉयस्टन डायस आणि शुभम रांजणे यांच्या भेदक गोलंदाजीसमोर बडोद्याचा पहिला डाव ४३६ धावांवर संपुष्टात आणण्यात मुंबईला यश आले.

विष्णू सोलंकी (१३३) आणि आदित्य वाघमोडे (११४) यांच्या दमदार शतकानंतर बडोद्याची ३ बाद ३०७ अशी स्थिती असताना पंडय़ाने ९ चौकार आणि १ षटकारासह ७३ धावा फटकावल्या. पण ३ बाद ३५१ धावांवरून बडोद्याची ७ बाद ३७९ अशी स्थिती झाली. भार्गव भट्टने १८ धावा फटकावत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण तळाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने बडोद्याला मुंबईचे ४६५ धावांचे आव्हान पार करता आले नाही. रॉयस्टन आणि डायस तसेच आकाश पारकरने पाहुण्या बडोद्याचा पहिला डाव ४३६ धावांवर आटोपला. रॉयस्टनने ४ तर रांजणेने ३ गडी बाद केले. पारकरने त्यांना चांगली साथ देत दोन मोहरे टिपले.

प्रत्युत्तरादाखल, मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. आदित्य तरे आणि कर्ष कोठारी यांना हार्दिक पंडय़ाने माघारी पाठवत बडोद्याला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर मुंबईने २ बाद २० धावा फटकावत एकूण ४९ धावांची आघाडी घेतली आहे. सोमवारी चौथ्या दिवशी मुंबईच्या फलंदाजांना महत्त्वपूर्ण योगदान द्यावे लागेल तरच पहिल्या डावातील आघाडीचे गुण त्यांना मिळवता येतील.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : सर्व बाद ४६५

बडोदा (पहिला डाव) : १४६ षटकांत सर्व बाद ४३६ (विष्णू सोलंकी १३३, आदित्य वाघमोडे ११४, हार्दिक पंडय़ा ७३; रॉयस्टन डायस ४/९९, शुभम रांजणे ३/६२)मुंबई (दुसरा डाव) : ११ षटकांत २ बाद २० (आदित्य तरे ८; हार्दिक पंडय़ा २/४)

Story img Loader