वानखेडे स्टेडियमवर चालू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अ-गटातील महत्त्वपूर्ण लढतीत गुणतालिकेत आघाडीवर असलेला सौराष्ट्र आणि माजी विजेता मुंबई यांच्यात पहिल्या डावातील आघाडी घेण्यासाठी संघर्ष सुरू आहे.
दुसऱ्या दिवशी सौराष्ट्रने मुंबईचा पहिला डाव ३९४ डावांत संपुष्टात आणून मग ५ बाद २१३ अशी मजल मारली आहे. ३ बाद ३७ अशा कठीण स्थितीतून सावरत सौराष्ट्रने ही मजल मारली असून, मुंबईची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी त्यांना आणखी १८१ धावांची आवश्यकता आहे.
अखेरच्या षटकात सौराष्ट्रचा अनुभवी फलंदाज शेल्डन जॅक्सनचा महत्त्वाचा अडसर मिनाद मांजरेकरने दूर केला. जॅक्सनचे शतक थोडक्यात हुकले. त्याने १४४ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ९५ धावा केल्या. जॅक्सनने प्रेरक मंकड (१०६ चेंडूंत नाबाद ५६ धावा) सोबत पाचव्या गडय़ासाठी १०७ धावांची भागीदारी रचली.
मुंबईकडून रॉयस्टन डायस आणि मांजरेकर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले, तर शिवम दुबेने एका फलंदाजाला बाद केले. सकाळच्या सत्रात सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकट आणि चेतन सकारिया यांनी मुंबईच्या संघावर अंकुश ठेवला. पहिल्या दिवशी ५ बाद ३३४ अशी दमदार मजल मारणाऱ्या मुंबईच्या उर्वरित निम्म्या संघाला १८ षटकांत ६० धावाच करता आल्या.
उनाडकटने नव्या चेंडूसह रविवारी सर्वप्रथम दुबेला (३९) तंबूची वाट दाखवण्यात यश मिळवले. त्याने कर्णधार सिद्धेश लाडसोबत सहाव्या गडय़ासाठी ११२ धावांची भागीदारी केली. मग सकारियाने आकाश पारकरला आणि उनाडकटने तनुश कोटियनला बाद केल्यामुळे मुंबईची ८ बाद ३६२ अशी अवस्था झाली.
लाडने झुंजार खेळी साकारताना १४६ चेंडूंत १६ चौकार आणि एका षटकारासह १०८ धावा केल्या; पण शतकानंतर सकारियाने त्याला फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. मग डावखुरा वेगवान गोलंदाज उनाडकटने मांजरेकरला पायचीत करून मुंबईच्या डावापुढे पूर्णविराम दिला. सौराष्ट्रकडून उनाडकटने ७१ धावांत ४ बळी मिळवले, तर सकारिया आणि डावखुरा फिरकी गोलंदाज धर्मेद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
- मुंबई (पहिला डाव) : ३९४ (जय बिस्ता १२७, सिद्धेश लाड १०८, विक्रांत औटी ५७; जयदेव उनाडकट ४/७१, चेतन सकारिया ३/८६)
- सौराष्ट्र (पहिला डाव) : ५ बाद २१३ (शेल्डर जॅक्सन ९५, प्रेरक मंकड नाबाद ५६; रॉयस्टन डायस २/३२, मिनाद मांजरेकर २/४६)