कर्णधार फैझ फझल आणि अक्षय वाडकर यांनी दुसऱ्या डावात केलेल्या दमदार खेळीच्या बळावर विदर्भाने महाराष्ट्राविरुद्धचा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ‘अ’ गटातील सामना अनिर्णित राखण्यास यश मिळवले. मात्र पहिल्या डावातील २२३ धावांच्या आघाडीमुळे महाराष्ट्राला तीन, तर विदर्भाला अवघ्या एका गुणावर समाधान मानावे लागले.
पहिल्या डावात निराशा करणाऱ्या विदर्भाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात तब्बल ५२१ धावांचा डोंगर उभारला. फझलने १६ चौकार व दोन षटकारांसह १३१ धावांची खेळी साकारली. तर अक्षयने १७ चौकारांसह नाबाद १२२ धावा करत महाराष्ट्राच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक
- महाराष्ट्र (पहिला डाव) : १०५.५ षटकांत सर्वबाद ३४३
- विदर्भ (पहिला डाव) : ४४.५ षटकांत सर्वबाद १२०
- महाराष्ट्र (दुसरा डाव) : १७५ षटकांत ८ बाद ५०१ (फैझ फझल १३१, अक्षय वाडकर १२२; सत्यजीत बच्चाव ३/१०९).
पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मुंबईला तीन गुण
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पहिल्या डावात मिळवलेल्या १०४ धावांच्या आघाडीवर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील रेल्वेविरुद्धच्या ‘अ’ गटातील अनिर्णित राहिलेल्या सामन्यात महत्त्वपूर्ण तीन गुण मिळवले. दुसऱ्या डावात मुंबईने पाच फलंदाजांच्या मोबदल्यात ३२१ धावा केल्या. मुंबईसाठी आदित्य तरेने शतक, तर पहिल्या डावातील शतकवीर शिवम दुबे व सिद्धेश लाड यांनी अर्धशतकी योगदान दिले. मात्र पहिल्या डावात रेल्वेचा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या तुषार देशपांडेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
- मुंबई (पहिला डाव) : ११५.२ षटकांत सर्वबाद ४११
- रेल्वे (पहिला डाव) : १०४.२ षटकांत सर्वबाद ३०७
- मुंबई (दुसरा डाव) : १०२.४ षटकांत ५ बाद ३२१ (आदित्य तरे नाबाद १००, सिद्धेश लाड ७६; हर्ष त्यागी ३/८६)
निकाल : सामना अनिर्णित (मुबंई ३ गुण, रेल्वे १ गुण).
सामनावीर : तुषार देशपांडे