घरच्या मैदानावर दोनवेळा पराभवाचा सामना करावा लागलेल्या मुंबईच्या संघाने आगामी सामन्यासाठी संघात महत्वाचे बदल केले आहेत. गेल्या काही सामन्यांमध्ये आश्वासक कामगिरी करणारा मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर आदित्य तरे मुंबईचं नेतृत्व करणार आहे. सूर्यकुमार यादवसोबत पृथ्वी शॉ देखील दुखापतीमुळे आगामी सामन्यात खेळू शकणार नाहीये. याचसोबत अजिंक्य रहाणेही न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असल्यामुळे तो रणजी सामन्यात खेळू शकणार नाहीये.
असा असेल मुंबईचा तामिळनाडूविरुद्धचा संघ –
आदित्य तरे (कर्णधार), सिद्धेश लाड, जय बिस्ता, आकिब कुरेशी, हार्दिक तामोरे, शुभम रांजणे, आकाश पारकर, सर्फराज खान, शम्स मुलानी, विनायक भोईर, शशांक अत्राडे, दिपक शेट्टी, तुषार देशपांडे, भुपेन ललवानी, रोस्टन डायस
११ जानेवारीपासून चेन्नईत दोन्ही संघ समोरासमोर येतील. घरच्या मैदानावरील दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईच्या फलंदाजांनी निराशा केली होती. यानंतर माजी खेळाडूंनी संघात काही बदल करण्याच्या सुचनाही केल्या होत्या. मुंबईकर आणि भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांचा आत्मविश्वास वाढवला होता. त्यामुळे तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा संघ कसा कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – Ranji Trophy : संकटात सापडलेल्या मुंबईला मिळाला ‘हिटमॅन’चा आधार