भारतीय वन-डे संघाचं तिकीट मिळालेले श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबई विरुद्ध रेल्वे सामन्यात, दोन्ही खेळाडूंनी विश्रांती घेणं पसंत केलं, नेमक्या याच सामन्यात मुंबईला घरच्या मैदानावर मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यातच विश्रांती घेण्यासाठी शिवम आणि श्रेयसने सांगितलेलं कारण आणि बीसीसीआयची बाजू यांच्यात विसंगीत आढळल्यामुळे MCA ची कार्यकारणी दोघांवर नाराज असल्याचं समजतंय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही खेळाडूंना आगामी काही सामन्यांसाठी संघाबाहेर ठेवलं जाऊ शकतं.

जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय??

२०१९ ला भारतीय संघाने घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका खेळली. शिवम आणि श्रेयस यांची या मालिकेत भारतीय संघात निवड झालेली होती. मालिका संपल्यानंतर श्रेयस आणि शिवम यांनी, आम्हाला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचं कारण सांगत रेल्वेविरुद्ध रणजी सामन्यात भाग न घेणं पसंत केलं.

मात्र मुंबईला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर MCA च्या अधिकाऱ्यांनी भारतीय संघाच्या निवड समितीशी चर्चा केली. यामध्ये निवड समितीने दोघांना असा कुठलाही सल्ला दिला नसल्याचं समोर आलं. “मग दोघांना विश्रांतीचा सल्ला दिला कोणी?? ट्रेनर की फिजीओ…की या दोघांनी स्वतः विश्रांती घेण्याचं ठरवत बोर्डाच्या खांद्यावर जबाबदारी ढकलली. घडलेल्या प्रकाराबद्दल MCA मध्ये प्रचंड नाराजी आहे. पुढच्या बैठकीत यावर नक्कीच चर्चा होईल, आणि आम्ही कारवाईही करु शकतो.” MCA मधील सुत्रांनी टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला माहिती दिली.

अवश्य वाचा – रणजीतही रेल्वेमुळे मुंबईची दैना ; १० गडय़ांनी पराभवाची नामुष्की

महत्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईच्याच शार्दुल ठाकूरला विंडीजविरुद्ध वन-डे मालिकेत संधी देण्यात आली होती. मात्र, शार्दुल रेल्वेविरुद्ध सामन्यात सहभागी झाला होता. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये MCA श्रेयस आणि शिवम दुबेबद्दल नेमका काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – …मस्त डब्बा घातला ! रेल्वेविरुद्धच्या पराभवानंतर विनोद कांबळी मुंबई संघावर नाराज

Story img Loader